नंदीबाबा उद्यान प्रकरणी एकाच कामाच्या बनवल्या दहा फाईली

दहा वर्षे उलटूनही कामाची चौकशी नाही

ठाणे : माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अंतर्गत येत असलेल्या नंदीबाबा उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा तब्बल ४९ लाख खर्च करण्याचा घाट ठाणे महापालिकेच्या वतीने घातला जात असला तरी १० वर्षांपूर्वी पूर्वी केलेल्या कामांची अद्याप चौकशी झालेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

विशेष म्हणजे १० वर्षांपूर्वी या उद्यानावर ९४ लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला असून एकाच कामाच्या वेगवेगळ्या १० फाईली तयार करण्यात आल्या असल्याचे वास्तव समोर आले आहे. नवीन काम सुरु करण्यापूर्वी आता तरी या जुन्या कामांची चौकशी होणार का असा प्रश्न आता यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

ढोकाळी येथील नंदीबाबा उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी सध्या ४९ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामाच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत. मात्र २०१३ म्हणजेच १० वर्षांपूर्वी या उद्यानाच्या सुशोभकरणासाठी तब्बल ९४ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी झालेले काम आणि प्रत्यक्षात खर्च करण्यात आलेला निधी यामध्ये मोठी तफावत असल्याचे आक्षेप घेत ठाण्यातील दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी तत्कालीन आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली होती. यावर तत्कालीन आयुक्त यांनी यासंदर्भात तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेले दहा वर्ष उलटूनही अद्याप झालेल्या कामांची कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाहीच मात्र आता पुन्हा एकदा सुशोभीकरणासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या असल्याने प्रशासनाची भूमिकाचा संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे.

दुसरीकडे २०१३ ला जी कामे करण्यात आली त्या एकाच कामांसाठी एकच फाईल न करता या कामासाठी वेगवेगळ्या १० फाईल्स बनवण्यात आल्या होत्या. मात्र कामातही अनियमितता झाली असल्याची तक्रार चंद्रहास तावडे यांनी त्यावेळीच केल्या होत्या. वास्तविक एका कामाच्या दहा वेगवेगळ्या फाईली करूनही हे काम एकाच कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आले असल्याचा संशयही तावडे यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. मात्र अद्याप यावर कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मॅन्युअल ॲक्ट मध्ये अट क्रमांक १५६ चा भंग करून वेगवेगळ्या क्रमांकाच्या १० फाईल्स तयार करण्यात आल्या. ही कामे तातडीने करून घेण्यात आली मात्र कोणत्याही प्रकारची तातडी यामध्ये विशद करण्यात आलेली नाही. झालेल्या कामांमध्ये जोडण्यात आलेले दरपत्रक संशयास्पद आहेत, यामध्ये स्वाक्षऱ्या आणि हस्ताक्षर संशयास्पद आहे. सारख्याच पुरवठादाराकडून वेगवेगळ्या लेटरहेडवर दरपत्रक घेण्यात आलेले आहेत. झालेल्या कामांचा खर्च अधिक पटीने वाढवण्यात आला आहे.

‘मी यापूर्वीच झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. यासंदर्भात वारंवार स्मरणपत्रेही पाठवली आहेत. मात्र दहा वर्षे याची चौकशी झालेली नाही. आता पुन्हा नव्याने अशाच प्रकारच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. जुन्या कामांची चौकशी झाली नाही तर न्यायालयात जाण्याची माझी तयारी आहे “, असे चंद्रहास तावडे यांनी सांगितले.