तिसरी मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये नुकत्याच राष्ट्रीय दर्जाच्या ११ वर्षाखालील वयोगटांमधील बॅडमिंटनपटूंसाठी अजिंक्यपद स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
स्पर्धेत चार विविध गटांमध्ये सामन्यांचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या एकेरीच्या गटात तामिळनाडूच्या जेरो सीबी या खेळाडूने उत्तर प्रदेशच्या शिव पनवर या खेळाडूवर मात करीत सुवर्णपदक आपल्या नावे केले. पहिल्या फेरीपासूनच दिमाखदार खेळाचे सादरीकरण करताना त्याने अंतिम फेरीचा सामना २१-१४,२१-१० असा एकहाती जिंकून आपली दखल घेण्यास भाग पाडले.
मुलींच्या एकेरीच्या गटात तेलंगणा राज्याने सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके आपल्या नावे केली. ल्योषा कोरुकोंडा या गुणी खेळाडूने शनवी निम्मा हिचा अंतिम फेरीच्या सामन्यात पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले तर निमा हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या दुहेरीच्या गटात राजस्थानची जोडी लोकेश गुर्जर आणि रक्षित सिंग यांनी उत्तराखंड राज्याची जोडी सार्थक जोशी व पूरब कार्की यांच्यावर २१-१८,२१-१६ अशा सरळ सेटमध्ये मात करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
मुलींच्या दुहेरीच्या गटात अनेक रोमहर्षक सामान्यांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता आला. या गटात पुन्हा एकदा तेलंगणाच्या खेळाडूंनी बाजी मारून या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. ल्योषा कोरुकोंडा व शनवी निम्मा या जोडीने कर्नाटक राज्याच्या सुमया शरीफ व शांभवी शर्मा यांचा अंतिम फेरीत पराभव करीत सुवर्णपदक पटकावले आणि या सुवर्णपदकासोबतच ल्योषा कोरुकोंडा या खेळाडूने या स्पर्धेतील एकमेव दुहेरी मुकुट आपल्या नावे केला. दीर्घकाळ चाललेल्या सामन्यात तेलंगणा राज्याच्या जोडीने १५-२१,२१-१६,२१-९ सेटमध्ये कर्नाटकच्या खेळाडूंचा पराभव करीत सुवर्णपदक पटकावले आहे.
संपूर्ण देशातील एकूण 32 राज्यांमधून सुमारे साडेतीनशे उभरते चिमुकले बॅडमिंटनपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे आयोजन ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने केले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 7 डिसेंबर 2024 रोजी पार पडला.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे खजिनदार आणि त्याच प्रमाणे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी उपस्थित राहून खेळाडू तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने नियुक्त केलेले ऑब्सरवर आणि गुजरात राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव मयूर पारीख हे देखील या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे अनेक गुणवान व उभरत्या खेळाडूंना कमी वयापासूनच राष्ट्रीय दर्जावर स्पर्धात्मक पातळीची जाणीव होईल आणि त्यामुळे त्यांना भविष्यात आपला खेळ सुधारण्यात आणि तसेच बॅडमिंटन मध्ये करिअर घडवण्यासाठी खूप फायदा होईल केवळ या एका हेतू मुळे या स्पर्धेचे ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने भव्य असे आयोजन केले आहे असे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.