जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी शिक्षक सरसावले

गृहभेटी, चित्रफितीच्या माध्यमातून करणार प्रचार

ठाणे : खासगी शाळांचे आव्हान, पटसंख्येवरील परिणाम यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सरसावले आहेत. विविध उपक्रम गृहभेटी, चित्रफिती, प्रवेशोत्सव, जनजागृती आणि कॅम्पेनिंगच्या माध्यमातून गाव पाड्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी शिक्षकांनी आपल्या स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढेल असा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या, खासगी शाळा वाढल्यानंतर त्याचा सरकारी शाळांना फटका बसू लागला आहे. अनेक शाळांची गुणवत्ता असूनही केवळ मराठी माध्यमामुळे या शाळांमध्ये प्रवेश कमी होत आहेत. तसेच ५० वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या संस्थांच्या अनुदानित, विशेषत मराठी माध्यमाच्या शाळांचीही विद्यार्थीसंख्या झपाटय़ाने घटत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या टिकवण्याचे आव्हान शाळांसमोर आहे. त्यावर उपाय म्हणून उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षक विद्यार्थ्यांचा शोध घेऊन पटसंख्या वाढवण्याचे काम करत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा समजली जात असतानाच अंबरनाथ येथील कान्होर जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत पटसंख्या वाढीसाठी नवी शक्कल लढवली आहे. अमोल पेन्सलवार या शिक्षकाने हे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्याद्वारे चित्रफिती तयार करून व ती समाज माध्यमावर प्रसारित करून शाळेत देण्यात येणाऱ्या दर्जेदार शिक्षण आणि उपक्रमांबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे शाळांची पटसंख्या वाढीसाठी मदत होणार असून, शिक्षकाच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.तर भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राहनाळ येथे मुख्याध्यापक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक अंकुश ठाकरे, संध्या जगताप, राजश्री पाटील, रसिका पाटील व चित्रा पाटील तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात गृहभेटी सुरु केल्या असून, शाळेत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजना, उपक्रम, शाळेतील खास आकर्षण याबद्दल पत्रके वाटून माहिती दिली जात आहे. या पत्रकात शाळेला मिळालेले पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांची कामगिरी आदी बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यातील शेंदरून या आदिवासी पाडयातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी प्रवेशोत्सव साजरा झाला असून, या प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांसह पालकांनाही सामावून घेऊन शाळा प्रवेशाबाबत जनजागृती केल्याचे शिक्षक नामदेव बांगर यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांचे मंथन, शिष्यवृत्ती परीक्षेतील यश, विविध उपक्रमांतर्गत पटकावलेली बक्षिसे याबद्दल विद्यार्थी व पालकांना माहिती देण्यात आली. यामुळे इतर शाळांतील मुलेही जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षित होणार असल्याचे बांगर म्हणाले.