स्पेलिंग चुकले म्हणून शिक्षिकेची मुलाला बेदम मारहाण

भाईंदर: ठाणे जिल्ह्यातील भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये एका सहा वर्षांच्या चिमुकल्याला खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षिका प्रतिमा प्रजापती यांच्याकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. लाकडी काठीने पाठीवर, हातावर, डोक्यावर मारले असून मोठ्या प्रमाणात पाठीवर वळ आले आहेत. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये राहणाऱ्या कल्पना निशाद यांचा सहा वर्षीय मुलगा ‘सिनियर केजी’मध्ये शिक्षण घेत आहे. शाळेला सुट्टी असल्याने इंग्रजीचा सराव करण्यासाठी पालक मुलाला परिसरात असलेल्या प्रतिमा प्रजापती यांच्याकडे क्लासेसला पाठवत होते. 11 मे रोजी साडेदहाच्या सुमारास मुलगा रडत रडत घरी आला. त्यावेळी त्याने सांगितले की, शिक्षिका प्रतिमा हिने मला ‘संडे, मंडे’मधील ‘स्पेलिंग’ वाचता येत नाही, म्हणून खूप मारले आहे. कल्पना यांनी आपल्या मुलाची परिस्थिती पाहता त्याला अमानुषपणे मारहाण केल्याचे निदर्शनास आले.

पालक कल्पना निशाद यांनी तत्काळ भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून संबंधित शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंदराव पाटील यांनी दिली आहे.