ठाणे: आपला जीव धोक्यात घालून आपत्तीशी लढा देणाऱ्या टीडीआरएफच्या जवानांना अद्याप ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही.
एनडीआरएफच्या धर्तीवर तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेत टीडीआरएफची स्थापना केली होती. महापालिकेच्या आस्थापनामधूनच या सर्व जवानांना मानधन मिळत असले तरी अजूनही हे सर्व जवान कंत्राटी पद्धतीने काम करत असून त्यांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्यात आलेले नाही.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी किंवा इतरवेळी देखील काही आपत्ती ओढावल्यास महापालिकेची टीडीआरएफ टीम नेहमीच सज्ज असते. ही टिम ठाणे जिल्ह्यातच नाही तर राज्यात देखील सक्रिय आहे. ठाणे जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात टीडीआरएफ टीम ही सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. टीमने आतापर्यंत अनेकांचे प्राण वाचविले आहेत. आतापर्यंत अनेकदा वेळेत पोहचून लोकांचे जीव वाचवण्याचे काम या टीडीआरएफने केले आहे.
३३ जणांच्या या टीमने जिल्ह्यासह राज्यातही अनेक ठिकाणी मोलाची कामगिरी केली आहे. भिवंडी येथील इमारत दुर्घटनावेळी २५ जणांना जीवदान देण्याचे काम याच टीमने केले होते. सर्वात महत्वाचे म्हणजे महाड येथील तळई येथे दरड कोसळ्ल्यावर सर्वात आधी पोहचून तेथे बचावकार्य सुरू केले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व टीमचे कौतुक केले होते. ठाण्याच्या या टीडीआरएफ टीमने केलेल्या विविध रेस्क्यू ऑपरेशनमुळे अनेकांचे प्राण वाचले. शिवाय झालेल्या मदतीबद्दल त्यांचा अनेकदा गौरवदेखील करण्यात आलेला आहे.
तुम्ही राज्य सरकारचे कर्मचारी झाले आहात, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, आजतागायत ते राज्य सरकारचे कर्मचारी होऊ शकलेले नाहीत. दुसरीकडे डिसेंबर २०२३ साली टीडीआरएफमधील ३० जवानांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असला तरी, हा प्रस्ताव शासनाच्या स्तरावर लालफितीमध्ये अडकला आहे. आचारसंहितेचे कारण देत हा प्रस्ताव अद्याप मार्गी लागला नसून यामुळे या सर्व जवानांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आलेले नाही.