ठाणे : मुंब्रा आणि कळवा भागातील शेकडो घरांना घरपट्टी लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षण मोहिमेत या घरांना कर आकारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी केली होती. ठाणे महापालिकेने यावर्षी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पत शहरातील कर आकारणी न झालेल्या घरांचे सॅटेलाईट सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
कळवा भागातील घोलाईनगर पौड पाडा, आतकोनेश्वर नगर, भास्कर नगर, इंदिरा नगर आणि शिवशक्ती नगर तसेच मुंब्रा भागातील काही झोपडपट्टी अशा सुमारे अडीच हजार घरांना कर आकारणी झाली नाही. १५व्या वित्त आयोगाच्या सुचनेनुसार घरांना कर आकारणी करणे बंधनकारक असताना या भागातील घरांना कर आकारणी झाली नसल्याचे श्री. मुल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आणले आहे. या भागातील गावगुंड गरिबांच्या घरांना कर आकारणी करण्यास अडथळा आणतात, कर आकारणीच्या नावाखाली पैसे उकळतात, असा आरोप करून गरिबांच्या घरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या घरांना कर आकारणी करण्याची मागणी श्री. मुल्ला यांनी केली असून त्यांची मागणी महापालिका आयुक्त श्री.राव यांनी मान्य केल्यामुळे या भागातील अनेक वर्षे रखडलेली कर आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.मुल्ला यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.