लक्ष्य जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी

नवी दिल्ली : ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक कमावणाऱ्या भारताच्या लक्ष्य सेनने जागतिक बॅडमिंटन महासंघाने मंगळवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत अव्वल १० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने दोन स्थानांनी सुधारणा करीत जागतिक क्रमवारीत नववे स्थान गाठले आहे.

उत्तराखंडचा २० वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य हा ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पाचवा खेळाडू ठरला. परंतु रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात डेन्मार्कचा जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील खेळाडू व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनने त्याची विजयी घोडदौड रोखली. मात्र लक्ष्यने ७४,७८६ गुणांची कमाई करीत  दिमाखदार आगेकूच केली. ताज्या क्रमवारीत किंदम्बी श्रीकांतची १२व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या लक्ष्य हा भारताचा पुरुष एकेरीतील सर्वोच्च क्रमांकावरील खेळाडू आहे.

ऑल इंग्लंडची उपांत्य फेरी गाठणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने महिला दुहेरीत १२ स्थानांनी आगेकूच करताना कारकीर्दीतील सर्वोत्तम असे ३४वे स्थान गाठले आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू क्रमवारीत सातव्या क्रमांकावर कायम आहे, तर सायना नेहवालने दोन स्थानांनी सुधारणा करीत २३वे स्थान गाठले आहे.

खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे आणि दुखापतींमुळे चीनने मंगळवारपासून सुरू झालेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.