पाणीटंचाईत टँकर घोटाळा: ३३ टँकर मंजूर, पाठवले २३!

शहापुरातील १४२ गाव-पाडे पाण्यासाठी आसुसले

शहापूर: तालुक्यातील भीषण पाणीटंचाई पाहता टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशित केल्यानुसार एका ठेकेदाराला ३३ टँकर मंजूर करण्यात आले मात्र प्रत्यक्षात २३ टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याप्रकरणी ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून दररोज तीन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

विवेकांनद ट्रान्सलाईनचे विवेकांनद शर्मा यांना कंत्राट देण्यात आले असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत ठेका मंजुर करण्यांत आलेला आहे. यामध्ये ३३ टँकर मंजुर असताना २३ टॅंकर उपलब्ध करुन दिलेले असून उर्वरीत १० टँकर उपलब्ध करुन न दिल्याने शहापूर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा उप विभागाच्या उप अभियंता यांनी ठेकेदाराला नोटीस पाठवली आहे. दरम्यान २४ तासांच्या आत हे टँकर उपलब्ध करुन न दिल्यास दररोज तीन हजार रुपये दंड आकारण्यात येईल असे सूचित केले आहे.

तालुक्यात पाणीटंचाई सन २०२५ मध्ये टंचाईग्रस्त गावपाडयांना उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्याकडील टँकर मंजुरी आदेशान्वये २६ गावे आणि १२६ पाडे अशा १४२ गावपाड्यांना एकुण ३३ टँकर मंजुर केलेले आहेत. त्यापैकी ठेकेदार शर्मा याने आजपर्यंत फक्त २३ टँकर दिलेले आहेत. उर्वरीत १० टॅंकर उपलब्ध करुन दिलेले नाहीत. शहापूर तालुक्यातील काही टंचाईग्रस्त गावपाडे हे अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून ग्रामपंचायत कोथळे, कळभोंडे, अजनुप, माळ, फुगाळे, अंतर्गत असलेले गांव-पाडे व कसारा खुर्दमधील दांड व उमरावणे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरंपच, ग्रामपंचायत अधिकारी यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे मागणी केली आहे. मात्र टँकरची अपुरी व्यवस्था असल्याने प्रशासनाला अडचण निर्माण झाली आहे.

तालुक्यातील जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा कालावधी संपूनही काही योजनेचे काम अर्धवट अवस्थेत ठप्प झाले असल्याने जलजीवन योजनेच्या ‘हर घर जल’ योजनेलाच घरघर लागली असल्याने ही योजनाच पूर्ण होत नसल्याने ठिकठिकाणी स्थानिक रहिवाशांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने महिला वर्ग संताप व्यक्त करीत आहेत. बिल मिळत नसल्याने अंतिम टप्प्यात आलेल्या योजना पूर्ण करण्यास ठेकेदार टाळाटाळ करीत असून अधिकारी वर्गही हताश झाला आहे. ज्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी जलजीवन योजनेची कामे घेतली आहेत त्यांनी कामांसाठी उसने पैसे घेतल्याने व दागिने गहाण ठेऊन कामे केल्याने आर्थिक कोंडी झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. शासनाने कामाचे बिल लवकरात लवकर अदा करावे यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारून आणि टक्केवारी देऊनही ते हताश झाले आहेत. दरम्यान सद्यस्थितीत १२६ पाडे व २६ गावांना ३३ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश असून टँकर ठेकेदाराने फक्त २३ टँकर उपलब्ध केल्याने पाणी टंचाई असलेल्या गाव – पाड्यांना पिण्याचे पाणी देणे शक्य होत नाही. ठेकेदाराने उर्वरित १० टँकर न दिल्याने येथील टंचाईग्रस्त गावात पाणी देता येत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. तथापी भावली पाणीपुरवठा योजनेवर जलजीवन मिशनच्या २१२ योजना मंजूर असून त्यापैकी ४० पूर्ण झाल्या आहेत तर १६७ योजनांचे काम प्रगतीपथावर असून पाच योजना अजून तांत्रिक अडचणीमुळे सुरूच झाल्या नाहीत.