जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा : भारताचा अर्मेनियावर विजय

भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या फेरीत अर्मेनियाला २.५-१.५ असे नमवून ‘फिडे’ जागतिक सांघिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पध्रेत दुसऱ्या विजयाची नोंद केली.

अ-गटात समावेश असलेल्या भारताने पहिल्या फेरीत अझरबैजानशी २-२ अशी बरोबरी साधली, तर दुसऱ्या फेरीत स्पेनला २.५-१.५ असे हरवले. तिसऱ्या फेरीतील विजयामुळे भारताने ७ गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले आहे, तर रशियाने ११ गुणांसह आघाडी टिकवली. रशियाने अझरबैजानचा ३.५-०.५ असा पराभव केला. स्पेनने फ्रान्सचे आव्हान २.५-१.५ असे मोडित काढले.

अर्मेनियाविरुद्धच्या सामन्यात तानिया सचदेव आणि भक्ती कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण विजय नोंदवले. तानियाने ४० चालींत अ‍ॅना एम. सर्गसियानला नमवले, तर भक्तीने सुसाना गॅबोयानचा ३० चालींत पराभव केला.

द्रोणावल्ली हरिकाने एलिना डॅनिएलियनशी बरोबरी साधली. परंतु पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये दिमाखदार विजय मिळवणाऱ्या आर. वैशालीने लिलिट मॅकशियानकडून पराभव पत्करला.

दुसऱ्या फेरीमधील यशात वैशालीच्या विजयाचे महत्त्वाचे योगदान होते. वैशालीने सिसिलियन फोर नाइट्स पद्धतीचा वापर करून सर्बियाच्या व्हेगा ग्युटिरेझचा ४७ चालींत पराभव केला. हरिका, भक्ती आणि मेरी अ‍ॅन गोम्स यांनीही आपापले सामने बरोबरीत सोडवले. हरिकाने अ‍ॅना मॅटनॅझला बरोबरीत रोखले. भक्तीने मारिया ईझ्ॉग्युएरी फ्लोरिसशी, तर गोम्सने मार्टा गार्सिया मार्टिनशी बरोबरी साधली.