यापुढे पाकिस्तानशी चर्चा दहशतवाद आणि ‘पीओके’वरच!

* ऑपरेशन सिन्दुर स्थगित, पण बंद नाही
* पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली: यापुढे पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर याच विषयांवर चर्चा होऊ शकते, असे स्पष्ट शब्दांत ठणकावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिन्दुर’ स्थगित असून ते बंद केलेले नाही, असा इशाराही पाकिस्तानला दिला.

भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला असून दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत सशस्त्रसंधीबाबत चर्चा झाली. त्यानंतर रात्री आठ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित केले.

श्री. मोदी म्हणाले, दहशतवाद आणि बोलणी सोबत होऊ शकत नाही. यापुढे दहशतवादी हल्ला केला तर सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. अणू बॉम्बची धमकी भारत सहन करणार नाही. दहशतवाद्यांची पाळेमुळे असणाऱ्या ठिकाणी जाऊन कारवाई केली जाईल, असा मोठा इशारा मोदींनी दिला. पाकिस्तानच्या हालचालींवर भारताचं लक्ष आहे. दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही. भारतीय सैन्य अलर्टवर आहे, असंदेखील मोदींनी यावेळी सांगितले.

श्री.मोदी पुढे म्हणाले, 22 एप्रिलला पहलगामध्ये दहशतवाद्यांनी जो निष्ठुरपणा दाखवला होता, त्याने देश आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरी करणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या परिवारासमोर, मुलांसमोर अतिशय निर्घृणपणे मारुन टाकणे हा दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावनेला तोडायचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही घटना खूप मोठी होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, प्रत्येक समाज, प्रत्येक पक्ष एका स्वरा मध्ये दहशतवादविरोधात कडक कारवाईसाठी उभे राहिले. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि त्यांची संघटनेला जाणीव झाली आहे की, आमच्या माता, भगिनींच्या कपाळावरील सिंदूर हटवण्याचे परिणाम काय होतात, हे पाकिस्तानने अनुभवले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

“ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी कोटी भावनेचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 6 मे च्या रात्री उशिरा, 7 मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना पाहिलं आहे. भारताच्या सेनेने पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर, त्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल की, भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

“पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताच्या मिसाईलने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनेच्या इमारती नाही तर त्यांचं धैर्यही कोसळलं. बहावलपूर आणि मुरुदसारखे दहशतवादी ठिकाणी एकप्रकारे ग्लोबल टेररझिमचे युनिव्हर्सिटी राहिले आहेत. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, मग ते 9/11 असेल, लंदन ट्यूब बॉम्बिंग असेल किंवा भारतातील मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले, त्या सर्वांचे तार याच ठिकाणावरुन जुळले आहेत. दहशतवाद्यांनी आमच्या भगिनींच्या माथ्यावरचं सिंदूर नष्ट केलं होतं. त्यामुळे आम्ही दहशतवाद्यांचे हे हेडक्वार्टर नष्ट केले. भारताने 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारलं आहे. दहशतवाद्यांचे आका उघडपणे पाकिस्तानात फिरत होते. जे भारताच्या विरोधात कट रचत होते त्यांना भारताने एका झटक्यात संपवून टाकलं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताच्या कारवाईने पाकिस्तान खूप निराश झाला. याच निराशेतून त्याने आणखी एक चुकीचं धाडस केलं. दहशतवाद्याविरोधात त्याने भारताची साथ देण्याऐवजी पाकिस्तानने भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली. पाकिस्तानने आमच्या शाळा, कॉलेज, गुरुद्वार, मंदीर, सामान्य नागरिकांच्या घरांना निशाणा बनवलं. पाकिस्तानने आमच्या सैन्यतळांना निशाणा साधला. पण आता पाकिस्तानचा चेहरा फाटला आहे. जगाने पाहिलं की, पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल कशाप्रकारे भारतासमोर उद्ध्वस्त झाली. भारताच्या सशक्त एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना आकाशातच नष्ट केले. पाकिस्तानची तयारी सीमेवर युद्धाची होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, मिसाईलने अचूकपणे हल्ला केला. भारताच्या वायुदलाने पाकिस्तानच्या त्या एअरबेसवर हल्ला केला ज्यावर त्यांना गर्व होता. भारताने तीन दिवसांत पाकिस्तानचं इतकं नुकसान केलं की, ज्याचा त्यांना अंदाज नव्हता”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.