वाढते हल्ले, अनधिकृत ढाब्यांच्या निषेधार्थ हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा
ठाणे : ठाण्यातील हॉटेल्स व्यवसायिकांवर वाढलेले हल्ले, अवैध मद्यविक्री, अनधिकृत ढाबे आणि १० टक्के व्हॅटच्या विरोधात ठाणे हॉटेल असोसिएशनने ३१ डिसेंबरला सर्व हॉटेल बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे तळीरामांचे खाण्यापिण्याचे चांगलेच वांदे होणार आहेत.
ठाणे शहरात तसेच घोडबंदर, येऊर आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर ढाबे आणि परवाने नसलेल्या हॉटेलमधून अवैधरित्या मद्य विक्री होत आहे. याबाबत शहरातील अधिकृत हॉटेल चालकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांना अवैध व्यावसायीकांच्या नावाची यादी देखील दिली असून अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नसल्याचा आरोप हॉटेल चालकांनी केला आहे.
राज्य शासनाने नुकताच दारूमध्ये १० टक्के व्हॅट वाढवला असून याचे आर्थिक नुकसान हॉटेल चालकांनाच सोसावे लागत असल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले. तसेच शहारत चौकाचौकात, गल्लोगल्ली, मोकळ्या जागेवर अनधिकृत ढाबे सुरु असून महापालिका आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अधिकृत हॉटेल चालकांचा व्यवसाय कोलमडल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
या सर्व कारणांमुळे ठाणे शहरातील बार आणि हॉटेल असोसिएशनने राज्य सरकारला यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. दरम्यान, दोन आठवड्यावर आलेल्या थर्टी फस्टच्या दिवशी शहरातील हॉटेल बंद करून राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी हॉटेल चालकांनी दिला आहे.