गेल्या काही दिवसांपासून नेता दुःखीकष्टी दिसत होता. काहीतरी बिनसलं होतं नक्की. प्रथमदर्शनी कोणालाही वाटावे की नेत्याला पूर्वी कोरोना झाला असल्यामुळे आणि त्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे शरीर दुबळेपण आले असावे. तोच त्यांच्या चेहऱ्यावर आणि एकूण मलूल झालेल्या व्यक्तिमत्वात उमटला असावा. एरवी उत्साही असणारा नेता प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात न चुकता सहभागी होताना दिसत असे आणि असा एकही दिवस जात नसे की त्याचे छायाचित्र वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले नसावे. बाकी फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे माध्यमांवर तर त्याचे विक्रमी फॉलोवर्स होते. लाईकची मक्तेदारी नेत्याला प्राप्त झाल्यामुळे त्यांची लाईकी सिद्ध होत होती. पण अलीकडे नेता प्रसिद्धीच्या वलयापासून दूर गेला होता,हे मात्र खरं. नेत्याने खट्टू व्हायचे बहुधा हेच कारण होते. तसं पाहायला गेलं तर नेता चार-चौघांसारखा, म्हणजे धुतल्या तांदळासारखा नसला तरी, त्याला इतके दुःखी पूर्वी कोणी कधी पाहिले नव्हते. त्याच्या मागे ना कधी ईडी लागली होती की सीबीआयचा ससेमिरा. त्याच्या नावावर साधी एफआयआरही दाखल झालेली नव्हती. असे असताना खरं तर नेत्याने उजळ माथ्याने आणि अधिक आनंदाने वावरायला हवे होते, पण इथे तर चेहऱ्यावर पार बारा वाजलेले! पोट स्वच्छ न झालेल्या माणसासारखा चेहरा करून नेता घरीच कुढत बसल्याचे पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही चिंता वाटू लागली होती. अर्थात या चिंतेमागे नेत्यांचे काय होणार यापेक्षा आपले काय होणार याचीच अधिक काळजी होती.
नेत्याच्या वर्तनात आणि देहबोलीत झालेला बदल (खांदे पाडून चालणे), दाढीची खुंटे वाढवून बिछान्यात तासननतास पडून छताकडे एकटक पाहत राहणे वगैरे लक्षणे पाहून कार्यकर्ते भलतेच अस्वस्थ होऊ लागले होते. अखेर त्यांच्यापैकी एकाने नेत्याकडे हा विषय काढलाच.
– आम्ही समजतो साहेब तुम्ही हळवे आहात. कोरोनामुळे जनतेला जो त्रास होत आहे तो तुम्हाला पाहवत नसेल. त्यामुळे तुम्ही उद्विग्न झाला. तुमची झोप उडाली असेल.- कार्यकर्त्यांनी विषयात हात घातला.
– तुम्ही खूप संवेदनशील आहात. उपचार नीट झाला नाही म्हणून तुम्ही डॉक्टरांवर हात उचलला होता. त्यामागे फक्त आणि फक्त काळजी होती. तळमळ होती. पण पत्रकारांनी तुम्हाला समजून घेतले नाही, याचे आम्हालाही दुःख झाले होते.
– अगदी बरोबर बोललात तुम्ही. आपल्या नेत्याला कोणी समजूनच घेत नाही. आता हेच पहा ना रुग्णालयांना जेवण पुरवण्याचा ठेका मेव्हण्याला द्यायचा की आपल्या कार्यकर्त्यांना असा विषय आला तेव्हा तुम्ही कार्यकर्त्याला जवळ केले, हे आम्ही कसे बरं विसरू?
– हो ना. तो कार्यकर्ता योगायोगाने तुमचा साडू निघाला याला तुम्ही तरी काय करणार?
– पण काही म्हणा काल रात्री तुम्ही नाल्याजवळील वस्तीत जाऊन घरात पाणी शिरलेल्या नागरिकांचे अश्रू पुसले हे पाहून आम्हालाही खूप गहिवरून आलं.
एवढंच काय, नाल्यावरील आपल्याच पक्षाचे कार्यालय स्वतःच्या हाताने पाडून तुंबलेला पाण्यालाच मी वाट मोकळी करून दिली. असा उदात्तपणा अलीकडे दुर्मिळच झाला आहे. याला त्याग म्हणतात.
– साहेब एवढं सारं तुम्ही आमच्यासाठी करता तरी असे दुःखी का?
– साहेब कोरोनाचे संकट जाईल तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागा. निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत.
– तेच म्हणतोय मी साहेब. असे हात-पाय गाळून बसला तर आमच्याही हातापायातला जीव जातो. आपण एखादा लस महोत्सव करूया का?
– साहेब तुम्ही मनावर घ्या. आम्हाला फक्त आदेश द्या. तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू.
कार्यकर्त्यांचे संभाषण निपचित ऐकत बसलेला नेता अखेर बोलला.
– हे पहा माझी मनाची ही अवस्था ना कोरोनामुळे झाली आहे की पुरापरिस्थितीमुळे. मला नाल्यावर बांधकाम केल्याचा पश्चातापही होत नाहीये की थोडी धक्काबुक्की केल्याचे दुःख. मला एकाच गोष्टीची चिंता सतावत आहे आणि ती म्हणजे माझ्या वाट्याला माझ्या विरोधकांप्रमाणे प्रसिद्धी का येत नाही याची.
– साहेब असं काय बोलताय? आपल्या विरोधकाचा एक पाय ऑलरेडी तुरुंगात आहे इतकी लफडी त्याच्या मागे लागली आहेत. ईडीचे लचांड संपत नाही तर सीबीआयचा ससेमिरा सुरू होतो. मध्येच लाचलुचपत प्रतिबंधकवाले कस्टडी मागतात. अशा कटकटींपेक्षा प्रसिद्धी न मिळालेलीच बरी.
– अरे वेड्यांनो तुम्हाला नाही समजणार त्यामागचं पॉलिटिक्स! आपला प्रतिस्पर्धी दररोज पेपरमधून झळकू लागला आहे. या गतीने लोक मला विसरणार नाहीत का? निवडणुकीपूर्वी अशी फुकट प्रसिद्धी त्याला मिळत असताना मी आनंदी कसा राहू शकेन बाबांनो?
– हो पण निवडणुकीच्या वेळी तो तुरुंगात असेल त्याचा काय?- कार्यकर्ता बोलला.
-अरे काय बावळटासारखा बोलताय? त्याच्यावर दोष सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष असणार आहे. माझं मात्र नाव जनतेच्या हार्ड डिस्कवरून तोपर्यंत डिलिट झालं असेल. काहीतरी करा पण माझ्यावर पुन्हा प्रसिद्धीचा प्रकाशझोत पडेल अशी आयडिया शोधा.
– साहेब एक आयडिया सुचली आहे तुमच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे बातमी पसरवूया का? ते पेगॅससवाले माझ्या ओळखीचे आहेत.
– झकास कल्पना आहे. लगेच त्यांच्याशी संपर्क साधा आणि माझ्यावर पाळत ठेवल्याची बातमी पत्रकारांना देऊन टाका. आज मी खुश आहे तुझ्या पेगॅससच्या या आयडिया वर. चला आपण सेलिब्रेट करुया.
भर बरं माझा पेग!
– पेगॅससच्या नावे चांग भले…असे म्हणत नेत्यांचे पेगभर दुःख क्षणात विरून गेले!