काश्मीरमधील हत्यांनंतर भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी; BCCI ने दिले उत्तर

जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने नागरिकांना लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या, विशेषत: बाहेरच्या राज्यांतून आलेल्या लोकांना मारले जात आहे. ज्यामध्ये बिहारमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. आता या हत्यांबाबत पाकिस्तानचा विरोध केला जात आहे. यासोबतच २४ ऑक्टोबरला होणारा भारत-पाकिस्तान टी -२० विश्वचषक सामना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

१६ ऑक्टोबर रोजी दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये काम करणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील मजूरांची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडानंतर लोकांचा पाकिस्तानविरुद्धचा राग आणखी वाढला. विशेषतः आता बिहारमध्ये पाकिस्तानला तीव्र विरोध होत आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनीही यासंदर्भात भाष्य केल्याने सर्वाचेच लक्ष याकडे वेधले आहे.

दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या बिहारमधील मृतांच्या कुटुंबियांनी पाकिस्तानविरोधात सर्वात आधी संताप व्यक्त केला होता. बिहारमधील अरविंद कुमारच्या कुटुंबाने भारत-पाकिस्तान सामना थांबवण्याची मागणीही केली. त्यानंतर आता राजकीय नेत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.

बिहारमधील बेगूसरायचे खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पाकिस्तानचा विरोध केला आहे. तसेच भारत-पाक टी -२० सामन्यावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. “काश्मीरमध्ये हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. पाकिस्तानच्या पाठिंब्याने दहशतवादी घटना घडत आहेत. आमले संबंध देखील चांगले नाहीत, अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी -२० सामन्याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे,” असे गिरीराज यांनी म्हटले आहे.

गिरीराज सिंह यांच्या व्यतिरिक्त, बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना थांबवण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “हे करणे आवश्यक आहे कारण यातून पाकिस्तानला स्पष्ट संदेश जाईल की जोपर्यंत तो दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारताचा त्याच्याशी कोणताही संबंध राहणार नाही.”

बीसीसीआयने दिले उत्तर

भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बिहार आणि इतर राज्यांमधून उठणाऱ्या आवाजांसह बीसीसीआय सतत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण या वक्तव्याच्या दरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे की सामना रद्द केला जाऊ शकत नाही. “काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जोपर्यंत भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील,” असे शुक्ला यांनी म्हटले आहे.