धोनीच्या आग्रहाखातर हार्दिक पंड्याचा भारतीय संघात समावेश

टी -२० विश्वचषकामध्ये सध्या टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल गदारोळ सुरू आहे. खराब फलंदाजीसोबतच तो सध्या गोलंदाजीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, खुद्द टीम इंडियाचे निवडकर्ते हार्दिकच्या फॉर्मवर खूश नसून त्याला भारतात परत पाठवायचे होते, अशी बातमी आहे. पण टीम इंडियाचा मेंटर महेंद्रसिंह धोनीने त्याला वाचवल्याचे बोलले जात आहे.

हार्दिक पंड्या गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पण यावेळी तो फ्लॉप ठरला. त्याने १२ सामन्यात फक्त १२७ धावा केल्या. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “खराब फॉर्म आणि गोलंदाजी न केल्यामुळे निवडकर्त्यांना पंड्याला भारतात परत पाठवायचे होते. मात्र धोनीच्या आग्रहाखातर हार्दिक पंड्याचा भारतीय संघात समावेश झाला. मेंटर झाल्यानंतर धोनीने पंड्या संघाचा जबरदस्त फिनिशर असल्याचे सांगत त्याला वाचवले.

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी केली नाही. फलंदाजी देखील त्यांने चांगली केली नाही. त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तो दुबईतील नेट सत्रात गोलंदाजी करत आहे. अशा स्थितीत तो न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करू शकतो, असे मानले जात आहे. तसे झाले नाही तर येत्या सामन्यांमध्ये पांड्याच्या जागी शार्दुल ठाकूर किंवा दीपक चहरला संधी मिळू शकते.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटने देखील हार्दिक पंड्याचे जोरदार कौतुक केले होते. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज एका रात्रीत तयार होऊ शकत नाही, असे तो म्हणाला होता. “मी पांड्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी केली ते तुम्ही पाहिले. मी त्याला फलंदाज म्हणून संघात ठेवले. तो असा फलंदाज आहे जो प्रतिस्पर्ध्याकडून सामना हिसकावून घेऊ शकतो. तो आमचा सामना विजेता आहे. टी -२० मध्ये अशा फलंदाजांची गरज आहे.”, असे कोहली म्हणाला होता.

हार्दिकची आज तंदुरुस्ती चाचणी

हार्दिक पंड्याने गोलंदाजीच्या सरावाला प्रारंभ केला असला तरी आज (शुक्रवार) त्याची आणखी एक तंदुरुस्ती चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही, हे स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.