ठाणे : स्वामी विवेकानंद यांनी जगात पहिल्यांदा भारतीय अध्यात्माची उंची दाखवून दिली. अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या जीवनावरील नाटकाने आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. यावेळी ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ॲड. सुभाष झा, ओमप्रकाश शर्मा, हसमुख गहलोत, संजय पेंडसे, डॉ. सुशील इंदोरिया, राजेंद्र दधिच, संजय धुमाळ, पत्रकार अनिल शुक्ला, ॲड. ओमप्रकाश परिहार, महेश जोशी, महेश बागडा, ॲड. तरुण शर्मा, अशोक पारिख, सतीश बंका आणि रवि तिवारी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
ब्रह्म फाउंडेशन, पीतांबरी यांच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील ‘मी विवेकानंद’ या हिंदी नाटकाचा 150 वा प्रयोग राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. ब्रह्म फाऊंडेशनचे ॲड. बी. एल. शर्मा, राधिका क्रिएशनच्या श्वेता शालिनी, संजय पेंडसे, निखिल मुंडले आदी व्यासपीठावर उपस्थित होते. राधिका क्रिएशनने या नाटकाची निर्मिती केली आहे.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, समाजात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे प्रेरणा देणारे अनेक संत, महापुरुष निर्माण होत असतात. स्वामी विवेकानंद यांनी पहिल्यांदा जगभरात भारताची धर्मपताका आणि विजयी पताका फडकवली. त्यांनी आत्मविश्वास आणि स्वाभिमान जागवला. भारतीय अध्यात्मिक उंची किती महान आहे हे स्वामीजींनी जगाला दाखवून दिले. अशा या तपस्वीवर विदेशात जास्त लिखाण झाले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाजासाठी, देशासाठी समर्पण करते तेव्हाच ती मोठी होते. त्यामुळे समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तिंचा गौरव व्हायला हवा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बह्म फाऊंडेशनचे श्री. शर्मा यांनी प्रास्ताविक केले. श्री. मुंडले यांनी आभार मानले.