ठामपा शाळेतील चौथीच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू

ठाणे : चितळसर मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. ६४ मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांसह आणि पोलिसही हळहळ व्यक्त करत आहेत.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापुरबावडी पोलिसांंनी बुधवारपासून याप्रकरणी गोपनीय तपास सुरु केला आहे. मात्र या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेचा तपास करताना सर्वतोपरी काळजी घेऊन आणि वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी सल्लामसलत करुनच तपासाची गती ठेवावी, असे आदेश तपास अधिकारी व अन्य अधिकारी, पोलीस कर्मचा-यांना देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, मृत झालेल्या विद्यार्थ्याचे काका विष्णु चंदनशिवे यांनी गुरुवारी, १२ जानेवारी रोजी कापुरबावडी पोलीस ठाण्यात हजर राहून सविस्तर जबाब दिला. त्यात त्यांनी संपूर्ण घटनाक्रम नमूद केला आहे. कुणालला काकुने सिव्हील आणले तेव्हा तो बेशुद्ध होता. ड्युटीवरील डॉक्टरांनी त्याला तपासले असता तो सायंकाळी ४.४५ वा. पूर्वी मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मानपाडा येथील ठाणे पालिकेच्या शाळेत शिकणा-या चौथी इयत्तेतील विद्यार्थ्याचा बुधवारी शाळेत बेशुद्ध पडल्याने मृत्यू झाला, असे महापालिकेच्या अधिका-याने गुरुवारी सांगितले. ‘कुणाल चंदनशिवे हा १० वर्षांचा विद्यार्थी मानपाडा येथील टीएमसी शाळा क्रमांक ६४ मध्ये चौथीत शिकत होता. बुधवारी दुपारी ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास मधली सुट्टी झाली होती. त्याला चक्कर आल्याने त्याच्या तोंडातून फेस आल्याचे आढळले. शिक्षक व कर्मचारी आणि जवळपासच्या विद्यार्थ्यांनी त्याला लगेचच नजिकच्या रुग्णालयात नेले. जेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर त्याला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला,’ अशी माहिती महापालिकेच्या शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी या वार्ताहराला दिली.

या मुलाच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत आणि ठाणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या कापुरबावडी पोलिसांंनी विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी सुरु केली आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर मुलाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्याचे शवविच्छेदन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सायंकाळी करण्यात आले. मात्र रुग्णालयाचे संबंधित अधिकारी शव घेण्यास तयार नाहीत, ही बाब मनसेचे अध्यक्ष रवी मोरे यांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ तेथे जाऊन आंदोलन केल्याने विच्छेदन करण्यात आल्याचे समजते. रुग्णालयाचे सिव्हील सर्जन डॉ. कैलास पवार यांच्याशी यासंबंधी संपर्क केला असता, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, दुदैवी विद्यार्थ्याचे शवविच्छेदन झाले असले तरी, त्याच्या अहवालातील माहिती देण्यास कापुरबावडी पोलिसांनी नकार दिला. यासंबंधी फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल मागण्यात येणार आहे.जेणेकरुन सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सुत्रांनी सांगितले.

कुणालचा नातेवाईक असलेल्या त्या शाळेतील एका विद्यार्थ्याने कुणाल आणि दुस-या मुलाचे भांडण झाल्याचे पाहिले. तेव्हा कुणाल हा खाली पडला होता आणि भांडण करणारा मुलगा कुणालच्या छातीवर बसून गळा दाबत होता. त्या मुलाने गळा दाबल्यामुळे कुणाल मयत झाला असावा. त्यावेळी शाळेतील शिक्षक जेवण करण्यासाठी गेले होते, असे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.