रुग्णालय अधिष्ठात्याचे निलंबन मागे

ठाणे: असुविधांच्या मुद्यांवरुन ठाणे महापालिकेने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु अवघ्या एका महिन्यातच त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ४ मार्च रोजी करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसुतीगृहासह वाचनालय, वृत्तपत्र वाचन केंद्राचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये असुविधा असल्याचे त्यांच्या निर्दशनास आले होते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

त्यानुसार अगदी काही वेळेतच याचा ठपका ठेवत या रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा व अन्य एका सहयोगी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु आता अवघ्या एका महिन्यातच डॉ. योगेश शर्मा यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

त्यांच्यावर झालेली कारवाई चुकीची होती. अशी उपरती बरोबर एका महिन्यानंतर पालिकेला झाली असून ४ एप्रिल म्हणजेच सुटीच्या दिवशी त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्यात आली आहे. परंतु अचानक पालिकेला हे शहाणपण कसे सुचले असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान शर्मा यांना मात्र प्राध्यापक पदाचा चार्ज देण्यात आला आहे. तर त्यांची विभागीय चौकशी सुरु असल्याची माहिती पालिकेने दिली. त्यात ते दोषी आढळल्यास पुढील कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.