* पुढील आठवड्यात सुरु होणार
* १५० रुग्णशय्येची क्षमता
ठाणे : सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. त्याचे उद्घाटन पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा घेता येणार आहे.
घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महानगरपालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली आहे. या इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावे असे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवले. या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आमदार सरनाईक यांनी २५ कोटींचा विशेष निधी मंजूर करून आणला.
या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. हे हॉस्पिटल म्हणजे गरीब-गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार आहेत. या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दीड लाखापासून पाच लाखांपर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील या दोन्ही हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने नळपाडा येथील हॉस्पिटल बांधून पूर्ण होत आहे, अशी माहिती श्री.सरनाईक यांनी दिली.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.