ठाणे: बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री सुपर-ब्लूमून दर्शन होणार असल्याचे खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की ज्या इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा येतात, त्या दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा आल्या आहेत. १ ॲागस्ट रोजी पौर्णिमा होती. बुधवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10-58 वाजता पौर्णिमेस प्रारंभ होत असून गुरुवार 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7-05 वाजता पौर्णिमा संपते.
तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्याजवळ आला तर त्याचे बिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसते. त्याला सुपर मून म्हणतात.
बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री आपणास सुपर-ब्ल्यू मूनचे दर्शन होणार आहे. त्यादिवशी सायंकाळी 6-40 वाजता चंद्र पूर्वेला उगवेल. उत्तररात्री 5-19 वाजता पश्चिमेला मावळेल. तसेच चंद्र पृथ्वीच्याजवळ तीन लक्ष 57 हजार 182 किलोमीटर अंतरावर येणार आहे. आकाश निरभ्र असेल तर बुधवारी 30 ऑगस्ट रोजी रात्रभर आकाशात सुपर ब्ल्यूमूनचे साध्या डोळ्यांनी दर्शन घेता येणार आहे. यानंतर पुढच्यावर्षी 2024 मध्ये 18 सप्टेंबरला सुपरमूनचे दर्शन होणार आहे असेही श्री. सोमण यांनी स्पष्ट केले.