तीन हातनाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत अभूतपूर्व वाहतूक कोंडी

ठाण्यात दोन ते तीन किमी वाहनांच्या लांबचलांब रांगा

ठाणे : सोमवारी ठाण्यातील तीन हातनाका उड्डाणपूल ते मुलुंड टोलनाक्यापुढे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. दररोज मुंबईला जाणा-या ठाणेकर चाकरमान्यांना सोमवारी सकाळी वाहनांच्या दोन ते तीन किमी लांबचलांब रांगांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांच्या बायोमेट्रिक हजेरीवर लेटमार्कची ‘मोहोर’ लागली.

मुलुंड पूर्वेकडे असलेला टोलनाका आणि अवजड वाहनांमुळे वाहने ‘एकाच ठिकाणी’ थांबली होती. सकाळी 8 ते सकाळी 11.30/ 12 वाजेपर्यंत हा गोंधळ सुरु होता. शेकडो दुचाकीस्वारांना हायवेवरुन वाट काढताना बरेचदा वाहतूक कोंडीचा त्रास सोसावा लागला. हायवेवर वाहनांची गर्दी वाढत गेल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी चालकांनी अंतर्गत सेवा रस्त्याचा मार्ग धरला. तेथेही बरेच दुभाजक उभारले असल्याने त्यांना पुढे जाता येईना. ठाणे महापालिकेने त्या रस्त्यांवर दुभाजक उभारले असल्यामुळे वाहनांची प्रचंड कोंडी झाली नाही.
सकाळी 8 च्या सुमारास मुलुंड हद्दीतून पुढे जाणारे मध्यम आकाराचे मालवाहू वाहन टोलनाक्याजवळ बंद पडल्यामुळे या मार्गावरुन जाणा-या वाहनांचा वेग मंदावला आणि तेथेही वाहनांची काहीवेळ कोंडी झाली.

याचवेळी या मार्गावरुन जाणा-या (मुंबई क्षेत्र) ‘मल्टि अ‍ॅक्सल’ ट्रकमध्येही मोठा तांत्रिक दोष उद्भवल्यानंतर त्यापाठोपाठ येणा-या सर्वच वाहनांची पुढे जाण्याकरीता कोंडी झाली. ती ‘वाढता-वाढे’ होत गेल्यामुळे ठाण्याहून मुलुंडकडे जाणा-या हायवेवर आणि टोलनाक्याचा रस्ताही ‘आहे तेथेच’ थांबलेल्या वाहनांखाली दिसेनासा झाला. सर्व वाहनांचे चालक हतबल झाले होते.

ठाण्यातील नोकरदार मुंबईच्या दिशेने कामावर जाण्यासाठी कूच झाले. साकेत पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक विभागाकडून जड अवजड वाहनांसाठी नोटिफिकेशन काढण्यात आले होते. रात्री 11 ते सकाळी पाच वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 ते 04 पर्यंत मुभा देण्यात आली होती. मात्र सर्रासपणे जड व अवजड वाहनांची कोंडी रस्त्यावर झाली होती. याचा नाहक त्रास चाकरमानी आणि रुग्णवाहिका यांना सोसावा लागला, असे चित्र सोमवारी दिसत होते. त्यामुळे मुलुंड हायवे टोल अधिकारी यांना अनुशेष पूर्ण होईपर्यंत टोल न भरता वाहतूक तत्काळ सोडण्याच्या सूचना ठाणे वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक पूर्ववत् झाली.

एकीकडे पूर्वद्रुतगती महामार्गावर हजारो वाहनांची गर्दी ‘साचली’ असतानाच हायवेमार्गे गुरुद्वाराकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांची गर्दी वाढतच गेली. प्रत्येकाला मुंबईला जाण्याची घाई असल्यामुळे आणि वाहतूक पोलिस नसल्यामुळे प्रत्येक चालक आपापल्या मर्जीने वाहन घुसवत होते. परिणामी कोपरी सर्कलमध्ये अगणित वाहनांची गर्दी दिसू लागली. कोपरीत ठाणे महापालिकेच्या सॅटीसच्या कामांच्यावेळी होणा-या वाहनांच्या गर्दीचे हुबेहुूब चित्र दिसले.