गावस्कर नावाचा ‘हिरा’; क्रिकेटरसिकांचा हिरो!

ज्या देशात क्रिकेट हा धर्म आहे आणि ‘क्रिकेटपटू हे देवासमान आहेत, त्याच देवांपैकी एकाचा आज आहे 75वा वाढदिवस. हो, आपल्या सर्वांचा लाडका क्रिकेटपटू सुनील गावस्कर त्यांचा डायमंड ज्युबिली वाढदिवस साजरा करतायत. त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर म्हणून ओळखले जाणारे गावस्कर यांनी आपल्या जादुई फलंदाजीच्या जोरावर, 1971 ते 1987 दरम्यान, भारतासाठी 100 हून अधिक कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळून प्रचंड आनंद लुटला. त्यांची बॅट जणु काही जादूची कांडी होती ! अवघड चेंडूंना सोप्या चेंडूंमध्ये रूपांतरित करून धावांचा डोंगर रचण्यात मदत करायची. त्यांने आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,000 पेक्षा जास्त कसोटी धावा आणि 3000 हून अधिक एकदिवसीय धावा केल्या.

मुंबईतील एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या गावसकर यांनी त्यांचे मामा माधव मंत्री, जे स्वतः भारताचे माजी क्रिकेटपटू यांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या गल्लीबोळात क्रिकेट खेळण्यापासून ते लॉर्ड्सच्या बाल्कनीत विश्वचषक मिरवण्यापर्यंत, गावस्कर यांचा प्रवास एखाद्या परीकथेपेक्षा काही कमी नाही. आणि एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या आत्मचरित्र ” सनी डेज” मध्ये नमूद केले आहे की जन्माच्या वेळी त्यांची एका मच्छीमाराच्या बाळाशी बदली झाली होती. कल्पना करा, ही अपघाती अदला-बदली झाली नसती तर काय झाले असते? कदाचित ते क्रिकेटच्या नेट्स ऐवजी फिशिंग नेट्सशी खेळत असते!!!

इतर महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंप्रमाणे गावस्कर यांनीही शालेय क्रिकेट खेळले. वर्षानुवर्षे त्यांने नुसता धावांचा धो-धो पाऊस पाडला. 1966 साली त्यांनी “भारताचा सर्वोत्कृष्ट स्कूलबॉय क्रिकेटर ऑफ द इयर” चा पुरस्कार पटकावून त्यांनी स्वतः साठी मुंबईच्या शालेय क्रिकेटमध्ये एक भक्कम स्थान निर्माण केले. त्यानंतर त्यांनी एका वर्षाच्या आत, मुंबईच्या राज्य क्रिकेट संघात प्रवेश केले आणि 1982 पर्यंत 15 वर्षे राज्यासाठी ‘खडूस’ क्रिकेट खेळले. गावस्करना बाद करणे हे त्या काळातील भल्याभल्या गोलंदानांना जमले नव्हते. तंत्रशुध्द बचाव आणि अत्यंत मोहक पदलालित्य ! त्यांच्या स्ट्रेट ड्रायव्हने त्या काळातील रसिकांना भुरळ घातली होती. खेळपट्टीवर गावस्कर म्हणजे मूर्तीमंत आधार – अत्यंत सुसंस्कृत आणि तितकेच मिष्किल असे हे लोकप्रिय व्यक्तीमत्व.

डोमेस्टिक स्तरावर उच्च दर्जाचे क्रिकेट खेळून, गावस्कर यांनी 1971मध्ये भारतीय संघात प्रवेश केला. कसोटी मालिका खेळण्यासाठी त्यांनी वेस्ट इंडिजचा दौरा केला आणि तिथूनच त्यांची धमाकेदार आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात झाली. 774 धावांचा विक्रम करून, वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी, त्यांने धारदार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी आक्रमणाचा सहजतेने सामना केला आणि कसोटी मालिकेत 700 हून अधिक धावा करणारा आजपर्यंतचा पहिला आणि एकमेव भारतीय खेळाडू बनला. त्यांच्या या विक्रमी पराक्रमाचा आणि उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, एका कॅरिबियन गायकाने आपल्या लिटिल मास्टरसाठी “गावस्कर कॅलिप्सो” हे गाणे लिहिले.

वेस्ट इंडिजमध्ये आपली छाप सोडल्यानंतर त्यांनी पाकिस्तानमध्येही 1978-79च्या मालिकेत शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानचा वेगवान सनसनाटी इम्रान खान यांनी गावसकर यांना “सर्वात कॉम्पॅक्ट बॅट्समन” म्हणून त्यांचे कौतुक केले. त्याच मालिकेत, गावस्कर यांनी एकाच कसोटीत दोन शतके झळकावली आणि ही शानदार कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले.

भारताचा माजी कर्णधार, भारताचा सर्वोत्कृष्ट सलामीवीर आणि विश्वचषक विजेता, गावस्कर यांचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान आणि देशासाठी त्यांनी केलेल्या सेवेमुळे त्यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने भूषवण्यात आले. त्याचबरोबर, त्यांच्या (आणि ॲलन बॉर्डरच्या) सन्मानार्थ, 1996 पासून, भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर- गावस्कर कसोटी मालिका खेळवली जाते. क्रिकेट खेळण्यापासून जरी त्यांनी निवृत्ती घेतली असली तरी ते खेळाशी जोडलेले आहेत. गावस्कर हे एक जाणकार आणि अस्खलित समालोचक आणि वृत्तपत्रातील स्तंभलेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. उंची बेताची असली तर कर्तृत्व उत्तुंग असणारे गावस्कर यांनी भारतीय क्रिकेटला मानाचे स्थान मिळवून दिले होते.

गावस्कर यांच्या बद्दल आपण कितीही लिहिले तरी ते कमीच. तरी या लेखातून त्यांच्याबद्दल काही लिहिण्याचा आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न. जाता जाता, त्यांच्यावर निस्सिम प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांबरोबर आमच्याही सुनील गावस्कर यांना त्यांच्या नव्या डावासाठी लाख लाख शुभेच्छा.