कल्याण : कल्याणातील एका बिल्डरकडे एका सुरक्षा रक्षकाने एक सदनिका आरक्षित केली होती. पहिल्या टप्प्यातील पैसे देऊन देखील बिल्डर सदनिका देण्यास टाळाटाळ करीत होता. अखेर सुरक्षा रक्षकाने पत्नी-मुलीसह रविवारी थेट बिल्डरचे कार्यालय गाठत आंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.
विठ्ठलवाडी येथे राहणारे सुरक्षारक्षक मंगेश शेवाळे यांनी कल्याण पूर्वेकडील भाल गावातील सिद्धिविनायक बिल्डर यांच्याकडे एक घर आरक्षित केले होते. पहिल्या टप्प्यात साडेचार लाख रुपये बिल्डरला दिले मात्र बिल्डरने त्यांना फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली. मंगेश याने पैसे परत मागितले असता बिल्डरने उडवा उडवीची उत्तरे दिली. अखेर मंगेश यांनी त्यांची मुलगी आणि पत्नीसह बिल्डरच्या कार्यालयात रविवारी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मंगेश शेवाळे यांच्यासह बिल्डर मंगल भाग्यवंत यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
विठ्ठलवाडी परिसरात राहणारे मंगेश शेवाळे हे मुंबई विद्याविहार येथे एका खाजगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. कल्याण पूर्वेकडील सिद्धिविनायक बिल्डर यांच्याकडे त्यांनी एक फ्लॅट बुक केला होता. या फ्लॅटची किंमत १० लाख ५० हजार रुपये त्यांना सांगण्यात आली. त्यांचा व्यवहार ठरला. शेवाळे यांनी ठरलेल्या रकमेपैकी चार लाख ५० हजार रुपये बिल्डरला दिले. हा व्यवहार करते वेळी बिल्डर मंगल भाग्यवंत यांनी घराची नोंदणी सुरू झाली आहे, तुम्हाला लगेच घराचा ताबा देतो आणि घराचे नोंदणी करून देतो असे सांगितले. घराचा ताबा 2023 मध्ये देण्याचे बिल्डरने त्यांना सांगितले. मात्र ऑक्टोबर महिना उजाडला तरी त्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळाला नाही.
अखेर ताबा घेण्यासाठी मंगेश यांच्या पत्नी गेल्या होत्या, मात्र बिल्डरने त्या फ्लॅटला टाळे ठोकले. मंगेश यांनी बिल्डर यांच्याकडे दिलेले पैसे परत करा असा तगादा लावला मात्र बिल्डरने त्यांना कसलीही दाद दिली नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली.