ठाणे: जोखमीची शस्त्रक्रिया करायची झाल्यास शासकीय रुग्णालयात नको. एखाद्या खाजगी रुग्णालयात केलेली उत्तम अस अनेकांना वाटत असले तरी, ठाणे सिव्हील रुग्णालयात आता अवघड शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. सार्वजनिक शौचालयात पाय घसरून पोलिओ झालेल्या पायाच्या तुटलेल्या खुब्याची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली.
ठाण्यात रहाणारे संजीव आंबोरे आपली रिक्षा घेऊन वागळे इस्टेट परिसरात उभे होते. दरम्यान लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयात गेले असता त्यांचा पाय घासरला अणि डाव्या पायाला पोलिओ झालेला होता, त्याच पायाला मोठी दुखापत झाली होती. नीट उठताही न आल्याने सर्वांच्या मदतीने त्यांना घरी नेण्यात आले. कंबरेच्या खुब्याजवळ दुखत होते. खूब्याजवळील हाड तुटल्याची शक्यता होती. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार करणे परवडणारे नव्हते. ठाणे सिव्हील रुग्णालयात शस्त्रक्रिया चांगल्या होतात, हे समजल्यामुळे आंबोरे कुटुंबीयांनी ठाणे सिव्हील रुग्णालयात त्यांना दाखल केले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव आंबोरे यांच्या खुब्यावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती अस्थितज्ज्ञ डॉ. विलास साळवे यांनी दिली.
अगोदरच एका पायाला पोलिओ झाल्यामुळे त्याच पायावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. संजीव आंबोरे यांच्या पायाचा एक्सरे काढला असता, कंबरेच्या खुब्याचे मांडीचे हाड तुटलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना उभे राहणे अवघड झाले होते आणि चालताही येत नव्हते.
मात्र काहीशी जोखमीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. आता शस्त्रक्रिया झालेल्या पायाची हालचाल होत असून, लवकरच त्यांना घरी पाठवले जाणार आहे.
ही शस्त्रक्रिया करतेवेळी भुलतज्ञ डॉ. अजय आळुस्कर, डॉ. प्रियंका महांगडे, डॉ. रुपाली यादव, परिचारिका जागृती गायकर, मिलिंद दौंड, रत्नाकर ठाकरे आणि नितीन राठोड तसेच फिजीओथेरपीसाठी डॉ. नम्रता पाटणे आणि डॉ. ज्ञानेश्वर सलगर यांनी परिश्रम घेतले.
शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.