हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोटे, फायमोसिस आदी शस्त्रक्रियांचा समावेश
ठाणे : लहान शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी खर्च करणे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यात लहान मुलांची जोखमीची शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना झेपत नाही. अशा सर्व शस्त्रक्रिया रविवारी ठाणे सिव्हील रुग्णालयात मोफत आणि यशस्वीपणे करण्यात आल्या.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या हर्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोट, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल १०० शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या.
दीड वर्षापूर्वी वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपात सिव्हील रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले. मात्र असे असताना, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ६०० ते ७०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. मात्र रविवारी लहान मुलांवर विविध शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. ठाणे-पालघर जिल्ह्यातून आलेल्या मुलांची शारीरिक तपासणी करून सोप्या आणि अवघड अशा
दोन्ही प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
शस्त्रक्रिया करायची असल्यामुळे दोन दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने केली होती. केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली मुला-मुलींच्या हर्निया, चरबीची गाठ, डोळ्यांचा तिरळेपणा, फाटलेले ओठ, हायड्रोसील, फायमोसिस, चिकटलेली बोटे, रक्ताची गाठ, मूळव्याध अशा विविध शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यासाठी सायन रुग्णालयाचे मोठे सहकार्य लाभले.
रविवारी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केईएम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ.संजय ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिव्हील रुग्णालयात लहान मुला मुलींच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावेळी काही जोखमीच्या शस्त्रक्रिया देखील यशस्वी पार पडल्या असून, दुर्बिणीद्वारे देखील शस्त्रक्रिया केल्या आहेत. सिव्हील रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून, मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत असतात, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
ठाणे सिव्हील रुग्णालयात चांगल्या शस्त्रक्रिया होतात हे केवळ ऐकून होते. मात्र आज प्रत्यक्ष अनुभवले आहे. एकाच दिवशी एवढ्या मुलांवर शस्त्रक्रिया पाहण्याची पहिलीच वेळ आहे. सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया पार पडत असतील तर सर्वांनी सिव्हील रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे कल्याण येथील रुग्णाचे नातेवाईक प्रमिला जाधव यांनी सांगितले.