खाडीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यात यश

ठाणे : साकेतजवळील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून तोल जाऊन एक १७ वर्षीय तरुण खाडीत पडला होता. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासह अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने केलेल्या बचाव कार्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले आहेत.

सोमवार ११ जुलै २०२२ रोजी रात्री ९:३०च्या सुमारास साकेत, महालक्ष्मी मंदिराजवळ ठाण्याकडे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरील ब्रिजवरून फरदीन खान खाली खाडीत पडला होता. घडलेल्या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दिवसभर पावसाचा जोर कायम असतानाही दोन तास शोध मोहीम राबवण्यात आली. फरदीन हा खाली पडल्यानंतर एका मँग्रोजच्या आधाराला धरून होता.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक पोचल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी ब्रिजवरून दोरी आणि लाईफ जॅकेट खाली सोडले. त्या दोरीच्या मदतीने तो ब्रिजला असलेल्या कॉंक्रिटच्या कॉलमवर बसला. सोमवारी रात्री बोटीच्या साहाय्याने फरदिनला बाहेर काढून जीव वाचवण्यात यश आले.