विद्यार्थ्यांनी नोंदी ठेवल्यास केलेले वाचन लक्षात राहील

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा सल्ला

ठाणे : मुलांनी वाचन करताना नोंदी ठेवण्याची सवय केली तर ते त्यांच्या अधिक लक्षात राहील आणि त्याचा योग्य ठिकाणी आणि योग्यवेळी उपयोग करता येईल, असा सल्ला लोकसभेच्या माजी अध्यक्ष श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी दिला. ठाण्यातील रोटरी क्लबतर्फे आयोजित ‘मॉडेल युनायटेड नेशन्स असेम्बली आणि मॉडेल पार्लमेंट सिस्टीम’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी श्रीमती महाजन ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहयोग मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात ‘ठाणेवैभव’चे संपादक आणि ज्येष्ठ रोटेरियन मिलिंद बल्लाळ यांनी श्रीमती महाजन यांना बोलते केले.

लहान वयात झालेले संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि त्याची जबाबदारी शाळांनी आणि कुटुंब संस्थेने घेतली पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याच्या मागे लागून त्याला चांगले व्याख्यान ऐकण्याची सवय लावायला हवी. चांगले ऐकलेले आयुष्यभर लक्षात राहते, असे त्या म्हणाल्या. शिक्षकांनी सुद्धा मन लावून शिकवले तर त्याचा परिणाम दीर्घकालापर्यंत राहतो, असे त्या म्हणाल्या. आजची पिढी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहत आहे. याला नाईलाज असला तरी माहिती आणि ज्ञान यामधील फरक लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे. पुस्तक वाचण्याची सवय लहान वयात लागली तर माणूस पुस्तकांवर प्रेम करू लागतो आणि एक वेगळे नाते त्यांच्याशी जमून जाते, असे श्रीमती महाजन म्हणाल्या.

श्रीमती महाजन यांनी जवळजवळ तासभर चाललेल्या या मुलाखतीत अतिशय मनमोकळेपणाने आणि आत्मियतेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकसभेचे कामकाज कसे चालते, त्यासाठी खासदार मंडळी कसा अभ्यास करीत असतात, याची उदाहरणे त्यांनी दिली. सर्वच पक्षात बोटावर मोजण्याइतकी अतिशय अभ्यासू खासदार मंडळी आहेत, असे सांगताना त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचा विशेष उल्लेख केला. श्री अटलबिहारी वाजपेयी आणि श्री. नरेंद्र मोदी यांनी देशाला एक अत्यंत वेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन केले. त्यामागे त्यांच्या भूमिकेतील विचार आणि तळमळ दिसून येते, असे त्या म्हणाल्या. पोखरण येथे झालेल्या अणु चाचणीबद्दल श्री. वाजपेयी यांचे कौतुक करताना श्री. मोदी यांनी कोरोना काळातील केलेले अभूतपूर्व कार्य वाखणण्याजोगे होते, असे त्या म्हणाल्या.