ठाणे : संभाव्य चौथ्या कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. महापालिका रुग्णालय आणि आरोग्य केंद्र सुसज्ज ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले असून कोरोनाच्या संभाव्य रुग्ण वाढीच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार शहरात लसीकरणासोबत आरटीपीसीआर व अँन्टीजन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी देखील नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केले आहे.
महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे कोरोनाबाबत महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजना सुविधांबाबतची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त वर्षा दीक्षित, उप आयुक्त दिनेश तायडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
शहरात कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी कोरोनाची तीव्र लाटेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे असून सर्व हॉस्पिटल्स अद्ययावत ठेवण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढल्यास प्रशासनावर ताण येऊ नये तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आतापासूनच संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देतानाच रुग्णवाहिका, ऑक्सिजन योग्य पुरवठा, ऑक्सिजन बेड, अँटीजेन व आरटी-पीसीआर चाचण्या करणे तसेच औषधांचा योग्य तो साठा करून ठेवण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागास आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरात आरोग्याच्या दृष्टीने मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझर या त्रिसूत्रीचा नियमित वापर होण्याच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या. त्याचबरोबर शहरातील साफसफाई कामाकडे दुर्लक्ष न करता प्रभाग समितीनिहाय दररोज परिसर साफसफाई, रस्ते, सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याच्या सूचनाही सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.
दरम्यान कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून महापालिकेच्या आरोग्य केंद्रात विविध वयोगटासाठी शासनाच्या सूचनेनुसार लसीकरण मोहीम सुरु आहे. तरी ज्या नागरिकांचे लसीकरण अद्यापही पूर्ण झाले नाही त्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी केले आहे.