अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

अंबरनाथ : बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ अंबरनाथला आज शिंदे समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून घोषणाबाजी केल्याने अंबरनाथला शिवसेनेत फूट पडल्याचे चित्र पहावयाला मिळाले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किणीकर तसेच आमदार गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ समर्थकांनी घोषणा दिल्या. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर आमदार डॉ. बालाजी किणीकर देखील  त्यांच्यासमवेत गुवाहाटीला रवाना झाले होते. आमदार डॉ. किणीकर यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये फलक लावण्यात आले होते.

अंबरनाथ शहरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने शहरात विकास कामे झाली आहेत, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन  एकनाथ शिंदे  सत्तेतून बाहेर पडले आहेत. महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडण्याची एकनाथ शिंदे यांनी मागणी केल्याने मागणीला  पाठिंबा देण्यासाठी  राज्यातील   शिवसेना आमदारांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळाले असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आणि सुभाष साळुंके यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनाच समर्थन असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रवी करंजुले, रविंद्र  पाटील, तुळशीराम चौधरी, उमेश गुंजाळ, गणेश कोतेकर, संदीप लोटे उत्तर भारतीय आघाडीप्रमुख प्रमोद चौबे, ज्ञानधर मिश्रा, यांच्यासह शिवसेनेच्या पुरुष आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून टाकला.