ठामपात प्रशासकीय राजवट; आयुक्तांच्या हाती कारभार

महापौर आणि पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

ठाणे –  ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली असून महापौर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या गाड्या महापालिकेत जमा केल्या असल्या तरी पदाधिकारी यांची कार्यालये मात्र सुरू होती.

महापालिकेत काल ६ मार्च पासून प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.  त्यामुळे महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची सत्ता संपुष्टात आली आहे.  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि प्रभाग समिती अध्यक्ष तसेच पाच विशेष समिती सभापती त्यांच्याकडील महापालिकेच्या गाड्या आणि सुरक्षारक्षक महापालिका प्रशासनाने काढून घेतले आहे.  एका पदाधिकाऱ्याने त्याची गाडी आणि सुरक्षारक्षक सोडले नव्हते असे समजते.

प्रशासकीय राजवट सुरू झाल्यानंतर पदाधिकारी यांच्या दालनाला टाळे लावणे आवश्यक असतानाही आज ही दालने उघडी होती.  महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही असे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.  याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  सांगितले की, महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा हे मुंबईला मंत्रालयात गेले होते म्हणून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र उद्या सर्व गाड्या आणि कार्यालये सील केली जातील असेही ते म्हणाले.