उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे सक्त आदेश
ठाणे : वेग नियंत्रकामध्ये बदल करणा-या, वेग मर्यादेचे पालन न करणा-या आडमुठ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. अशा चालकांचा बेफिकीरीपणा आणि वाहन हाकताना निर्धारित वेगमर्यादा न पाळणा-या चालकांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नियमांचे उल्लंघन धाब्यावर ठेवणा-या खाजगी अथवा सार्वजनिक बस चालक/ मालकाला मोटर कायद्यानुसार कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गाडी सुस्थितीत नसलेल्या बसला पुढील प्रवासाला परवानगी देण्यात येणार नाही. बेफिकीर बसचालकांमुळे झालेल्या अपघातांची मालिका संपत नसल्याने मोठे अपघात होत असल्याची घटना अलिकडेच घडली. दुर्घटना टाळण्याकरीता अशा चालकांविरूद्ध परिवहन विभागाने कडक धोरण अवलंबिले आहे. प्रत्येक बसचालकाने बस रस्त्यावर आणण्यापूर्वी वाहनाचे आपत्कालिन दरवाजे आणि खिडक्या सुस्थितीत ठेवणे, वेग नियंत्रकांमध्ये फेरबदल करणे, वेगमर्यदा पालन न करणे अशा सवयी असंख्य बस चालकांना आढळल्या असल्यामुळे त्यांना परिवहन विभागाच्या अधिका-यांकडून ‘दट्ट्या’ देण्यात येईल, जेणेकरुन प्रवाशांची सुरक्षित वाहतूक होईल, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
राज्यात खाजगी आणि सार्वजनिक बस दुर्घटनांच्या संख्येचा आलेख वाढतच चालला आहे. त्यामुळे बरेचसे बसमधून प्रवास करावा की नाही असा विचार करतात. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने प्रवासी वाहतूक विना अपघात होण्याच्या दृष्टीने बस चालक आणि मालकांसाठी नियमावली तयार केली आणि त्यांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बरेचसे बस मालक/ चालक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी गाडीत मोठे फेरबदल करतात आणि बेदरकारपणे बस चालवतात यामुळे तांत्रिक बाबी अपघातास करणीभत ठरत आहेत. त्यामुळे नियमानुसार वाहतूक नियोजन करण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी सांगितले. बस हाकण्यापूर्वी चालक, वाहक आणि मालकाने संपूर्ण बस तपासून मगच वाहतुकीसाठी बाहेर काढावी, बस कायद्यानुसार वेग मर्यादेत चालवणे, वेग नियंत्रक यंत्रणेत कोणताही बदल करू नये, आपत्कालिन दरवाजे आणि खडक्या सुस्थित आहेत की नाही याची खात्री करणे, प्रवासी सामना व्यतिरिक्त इतर कोणतेही सामान ठेवण्यास प्रतिबंध केला आहे आणि प्रथमोपचार पेटी, आग प्रतिबंधक संयंत्र सुस्थितीत ठेवण्याच्या सक्त सूचना ठाणे आरटीओ अधिका-यांनी मालक-चालक यांना दिल्या आहेत.
वाहतूक करताना मद्य प्राशन करून चालक बस चालवताना आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे. याकरीता बस वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने नियमावली तयार करण्यात आली. त्यामुळे वाहनाची कागदपत्रे, योग्यता प्रमाणपत्र, विमा अद्ययावत ठेवावा आणि परिवहन विगाकडून ठिकठिकाणी तपासणी मोहिम राबवली जाणार आहे, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.