भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू

ठाणे : येथील घोडबंदर मोघरपाडा भागातील फियामा रेसिडेन्सी येथे एका व्यक्तीने भटक्या श्वानाच्या डोक्यात क्रिकेटच्या फळीने मारल्याने श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर येथील मोघरपाडा ओवळा या भागातील फियामा रेसीडन्सी मधील गोकुळ थोरे (३५) यांनी एका भटक्या श्वानाच्या डोक्यात फळी मारल्याची घटना घडली. या मारहाणीत डोक्याला मार लागल्याने श्वानाला फिट येत होत्या. याबाबत अल्फा फाऊंडेशन या प्राणीमित्र संघटनेला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी जखमी श्वानाला ब्रह्मांड येथील सी.पी.सी.ए. रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता श्वानाला ऐरोलीमधील कार्थिकस पेट ॲनिमल दवाखान्यात नेण्यात आले. मात्र शुक्रवारी दुपारच्या सुमरास श्वानाच्या मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गोकुळ थोरे यांच्या विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे