एपीएमसीत स्ट्रॉबेरीचे भाव घसरले

आवक वाढल्याने दर अर्ध्याने कमी

नवी मुंबई: अवकाळी पावसाने लांबलेल्या स्ट्रॉबेरीचे आता चांगले उत्पादन निघत आहे. त्यामुळे बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून सरासरी तीन हजार क्रेट दाखल होत आहेत. आवक वाढत असल्याने त्याचा दरांवर परिणाम होऊन दर घसरू लागले आहेत. मागील महिन्यांत ५०० ते ६०० रुपये प्रतिकिलो मिळणारी स्ट्रॉबेरी आता १४० ते २४० रुपये प्रतिकिलोने उपलब्ध होत आहे.

राज्यातील थंड प्रदेश म्हणून ओळख असलेल्या पाचगणी, महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी’ पिकाची लागवड केली जाते. तर स्ट्रॉबेरीची वाढती मागणी पाहता नाशिकमध्येही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे उत्पादन वाढले आहे. एपीएमसी बाजारात पाचगणी महाबळेश्वर येथील तीन हजार क्रेट, नाशिक येथील १० ते १२ गाड्या स्ट्रॉबेरी दाखल होत आहे. सध्या स्ट्रॉबेरीची आवक वाढत आहे, त्यामुळे दरात घसरण झाली आहे.

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी येत असली तरी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पाऊस आणि हवामान बदल यामुळे हंगामालाही उशिरा सुरुवात झाली आहे. स्ट्रॉबेरी खाण्याबरोबरच आइस्क्रीम, शीतपेय, चॉकलेट यामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी स्वादाचा उपयोग होतो. त्यामुळे बाराही महिने स्ट्रॉबेरीला मागणी असते. विशेषतः हंगामादरम्यान अधिक मागणी असते. त्यामुळे महाबळेश्वर व वाई परिसरात कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्येही लागवड केली जात आहे.

आवक वाढत असल्याने बाजारात मागील महिन्याच्या तुलनेत दर आवाक्यात आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. नाशिक स्ट्रॉबेरी चवीला आंबट असल्याने जास्त मागणी नाही, त्यामुळे नाशिक स्ट्रॉबेरी एक बॉक्स म्हणजे दोन किलो स्ट्रॉबेरी १२० ते १८०रुपयांनी विक्री होत आहे.

बाजारात अंजीर दाखल होण्यास सुरुवात

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अंजीर फळ बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते, मात्र सततच्या पावसाने उत्पादनाला फटका बसला असल्याने अंजीर हंगामाला उशीराने सुरुवात झाली. अंजीर फळाला थंड वातावरणात अधिक बहर येत असतो. मागील काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवत आहे. या फळ उत्पादनाला जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकतही असते, परंतु सततचा पावसाचा मारा झाल्याने अतिरिक्त पाणी झाले होते. परिणामी अंजीर खराब झाले आहेत. बाजारात आता दोन ते तीन गाड्या दाखल होत असून प्रतिकिलो १५० ते ३०० रुपये दराने विक्री होत आहे.