बदलत्या हवामानाचा स्ट्रॉबेरीला फटका

नवी मुंबई : एपीएमसी बाजारात ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होतो. मात्र पडलेल्या पावसामुळे पाचगणी आणि महाबळेश्वरमध्ये काही ठिकाणी पावसामुळे लागवड झाली नाही तर लागवड केलेल्या रोपट्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे हंगामाला १५ दिवस उशिराने सुरुवात होणार असून सध्या बाजारात कमी प्रमाणात स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.

स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. डिसेंबर, जानेवारी महिन्यांत सर्वाधिक स्ट्रॉबेरी बाजारात विक्रीसाठी दाखल होत असून ऑक्टोबर अखेर आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाशीच्या एपीएमसी बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात सध्या तुरळक आवक होत असून महाबळेश्वरची ११७ क्रेट तर नाशिकचे पाच पिकअप अशी एकूण ७१ क्विंटल स्ट्रॉबेरी दाखल झाली आहे.

महाबळेश्वर स्ट्रॉबेरी प्रतिकिलो ४०० ते ७०० रुपये तर नाशिकची ३००-५०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. साधारणतः स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन निघण्यासाठी दोन ते अडीच महिने कालावधी लागतो. त्यामुळे अद्याप लागवड न झालेल्या उत्पादनाला जानेवारी महिना उजाडेल तर लागवड झालेले उत्पादन नोव्हेंबर अखेर बाजारात दाखल होईल, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली आहे.