धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक; महिलेच्या डोळ्याला गंभीर इजा

कल्याण : छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या धावत्या एक्सप्रेसवर आंबिवली स्थानकादरम्यान दगडफेक झाल्याने एका महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.

दिवा परिसरात राहणारे पाटील कुटुंबीय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेडला गेले होते. सोमवारी सकाळी नांदेडहून राज्यराणी एक्सप्रेसने कल्याणला येत असताना आंबिवली स्थानकादरम्यान अज्ञात समाज कंटकाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत रकमाबाई पाटील या ५५ वर्षीय महिला प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचार घेतले. ही जखम गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती सुत्रांनी दिली.

या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना नव्हती. प्रसार माध्यमातून बातम्या पसरल्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. आणि या प्रकरणाचा तपास सुरु झाला. ज्या ठिकाणी या महिलेवर दगडफेक झाली आाहे, ती जागा अति संवेदनशील असल्याचे बोलले जाते.

त्याठिकाणी अनेक वेळा प्रवाशांवर लुटीच्या इराद्याने दगडफेक झालेली आहे. दगडफेक करुन प्रवाशांच्या हातातील वस्तू खाली पाडून ती वस्तू घेऊन पसार होतात. या घटनेनंतर रेल्वे पोलीस यंत्रणा कधी जागी होणार असा सवाल या निमित्ताने उभा ठाकला आहे. आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या या घटनेबाबत कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दगडफेक करणार्या अज्ञाताचा शोध सुरु केला असून पोलिसांनी असे प्रकार थांबविण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून यानिमित्ताने जोर धरत आहे.

प्रशासनाने अशा घटना घडलेल्या लोहमार्ग परिसरात सीसीटिव्ही यंत्रणा बसवून दक्ष भूमिका घेत जनजागृती केली पाहिजे. जेणेकरून अशा समाजविघातक कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला चाप बसेल, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. आता तरी रेल्वे प्रशासनाने मागणीची अमंलबजावणी तातडीने केली पाहिजे, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता आरगडे यांनी सांगितले.