राज्य एसएससी बोर्ड बंद होणार नाही!

मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत बनविलेल्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) यांच्या आधारे महाराष्ट्राचे स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहे. त्यामध्ये आपल्या राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.

नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ.1 ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. 1 ली ते 10 वी साठी अभ्यासक्रम/पाठ्यक्रम निर्मिती एससीइआरटीएममार्फत करण्यात येत आहे.

सीबीएसईच्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये सांगण्यात येत आहेत. त्यानुसार, पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते.

विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता, प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो. राज्य, देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रम जेईई, नीट, युपीएससी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो.

सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते, त्यांना संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते.

महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण परंपरा आहे. त्यामुळे आपल्या राज्याचे अस्तित्व दाखविणारे राज्य मंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट राज्य मंडळ अधिक सक्षम करण्यासाठीचे हे पाऊल असल्याचे शिक्षण विभागाने म्हटलं आहे. नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यसाहित्य खालीलप्रमाणे अमलांत आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.