मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे : मराठा समाजाच्या मुलांचा जीव एवढा स्वस्त आहे का, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजातील तरुणांना केले आहे. आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्द आहे. मात्र थोडा धीर धरा, असे आवाहनही त्यांनी केले.

आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन मराठा समाजाच्या मुलांनी आत्महत्या केली. मी सुद्धा मराठा समाजातील शेतकरी कुटुंबातून वर आलो आहे. मी संपूर्ण महाराष्ट्राला माझे कुटुंब समजतो.
मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या या महाराष्ट्राला परवडणाऱ्या नाहीत. मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन श्री.शिंदे यांनी यावेळी केले.

युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरक्षण दिले, मात्र पुढे महविकास आघाडीच्या काळात सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. महाविकास आघाडी सरकारला कोर्टात आरक्षण सिद्ध करता आले नाही. १३ ऑक्टोबरला क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेतली आहे. आपले तज्ज्ञ वकील योग्य ते मुद्दे मांडतील. त्यामुळे आता जे आरक्षण मिळेल ते टिकणारे आरक्षण असेल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

मराठवाड्यात कुणबी दाखले देण्यासंदर्भात जुन्या नोंदी तपासण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन करण्यात आली असून आतापर्यंत पाच ते सहा हजार नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यावर युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जास्तीत जास्त लाभ कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजाला काय-काय लाभ देत आहोत याची ही जाहिरात आहे. साडेआठ टक्के मराठा तरुणांचा यामध्ये समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.