वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची ७२ वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा-२०२५ ठाण्यात १९ मार्चपासून सुरू होणार आहे.
ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे. के. केमिकल कंपनीच्या आवारात मातीच्या सहा क्रीडांगणांवर बुधवारपासून २३ मार्चपर्यंत दररोज सायंकाळी कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील अव्वल खेळाडूंची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी ६ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येईल. या वेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देणार आहेत.
ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला संजय वाघुले यांच्याबरोबरच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले यांच्याच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांची उपस्थिती होती.
ठाण्यात होणाऱ्या या स्पर्धेचे बोधचिन्ह बिबट्या ठेवण्यात आले आहे. तर या स्पर्धेची टॅग लाईन `श्वास कबड्डी ध्यास कबड्डी, आपली माती आपला खेळ…’ खेळू कबड्डी अभिमानाने… अशी आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष व महिला गटातून प्रत्येकी ३१ असे ६२ संघ सहभागी होणार आहेत. या संघातील गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवड केली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबत औत्सूक्य आहे.
यापूर्वी २०१४ मध्ये ठाण्यात राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा झाली होती. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. यंदाच्या स्पर्धेला छत्रपती पुरस्कार विजेते २४ व अर्जून पुरस्कार विजेते ५० खेळाडूही भेट देतील. या स्पर्धेत एकूण ८६८ पुरुष व महिला खेळाडू सहभागी होणार असून, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ७५ सामना अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.