नवी मुंबई : ऐरोली येथे नुकत्याच पार पडलेल्या अतिशय मानाच्या अशा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकादमीच्या अनघा करंदीकर हिने दुहेरी मुकुट पटकावण्याची दिमाखदार कामगिरी केली आहे.
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीमध्ये महिला दुहेरी व मिश्र दुहेरी खेळाचे धडे गिरवणाऱ्या अनघा करंदीकरने अतिशय राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून आपले वर्चस्व प्रस्थापित करून महिला आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपद प्राप्त करून दुहेरी मुकुटाचा मान मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उत्कृष्ट अशी कामगिरी करणाऱ्या अनघाने जून महिन्यात अजून एका राज्य स्तरीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवून आपल्या कामगीरीची दखल घ्यायला भाग पाडले होते. या स्पर्धेत तिने महिला दुहेरीत योगिता साळवेला साथीला घेत उपांत्य फेरीत अपूर्वा आचरेकर आणि नमिथा शेट्टी या जोडीचा १५-७,१५-४ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना प्रिषिता सिन्हा व शुभांगी मजुमदार यांच्या सोबत रंगला, या सामन्यात अनघा आणि योगिताने त्यांचा २१-१३, २५-२३ असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
मिश्र दुहेरीत सिद्धेश राऊत ला जोडीला घेत त्यांनी उपांत्य फेरीच्या सामन्यात ऋतुराज देशपांडे आणि अदिती रोडे चा १५-११, १६-१४ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्यांचा सामना मन गजरा आणि कशिका महाजन यांच्यासोबत झाला. या अटीतटीच्या सामन्यात त्यांनी २१-७, १७-२१, २१-१२ अशा सेट मध्ये विजय प्राप्त केला आणि अनघा करंदीकर हिने दुहेरी मुकुटाला गवसणी घातली.
तिच्या कामगिरीचे कौतुक करीत श्रीकांत वाड, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे आणि ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या संपूर्ण टीमने तिला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.।त्याचप्रमाणे अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्याच्या प्रथमेश कुलकर्णी आणि अथर्व जोशी यांनी टॉप सीडेड खेळाडूंना मात देत अतिशय चमकदार कामगिरी करीत सलग पाच सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आणि मुख्य फेरीत सुद्धा पहिला सामना जिंकून आगेकूच केली आहे.
ठाणे अकॅडमीच्या प्रथमेशने नुकत्याच झालेल्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने विजय प्राप्त केला होता. पहिल्या सामन्यापासून त्याने स्पर्धेत दबदबा निर्माण करीत तो आगेकूच करीत आहे. राऊंड ऑफ ६४ मध्ये त्याने ब्रुवू लिंगी चा १५-६,१५-५ असा सहज पराभव केला. तर राऊंड ऑफ ३२ मध्ये टॉप सीडेड अभिषेक वेंकट सोबतच्या अटीतटीच्या सामन्यात त्याचा १६-१४,८-१५,४-१५ अशा सेट मध्ये पराभव करीत पुढील प्रवेश केला. या फेरीच्या सामन्यात मंत्रा सोनेजा याचा त्याने १५-१०, १७-१५ असा पराभव करून पुढील मुख्य फेरीत धडक मारली. मुख्य फेरीच्या पहिल्याच सामन्यात त्याने सीडेड प्लेअर उन्निथ कृष्णा याला २१-१०, २१-१४ असे नमवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
त्याचप्रमाणे नुकत्याच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीकडून इंडोनेशिया येथे खास प्रशिक्षण घेऊन आलेल्या अथर्व जोशीने सुद्धा या राष्ट्रीय स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे.
त्याने राऊंड ऑफ ६४ मध्ये अजय विश्वा चा १५-१७,६-१५ असा पराभव केला व राऊंड ऑफ ३२ मध्ये स्रीनु चंद्रनाचा १५-१०,१५-८ असा सहज पराभव करीत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला. त्यात झालेल्या अटीतटीच्या झुंजीत यशदिप गोगोई याचा १५-१३,११-१५,६-१५ असा पराभव करीत अथर्वने मुख्य फेरीत धडक मारली. मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अथर्वने अभिषेक कुमारचा १४-२१,९-२१ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.