शहापूर आगारातील एसटी चालकाची आत्महत्या

शहापूर : मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप अजूनही तोडगा न निघाल्याने कायम आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान या संपामुळे पगार न झाल्याने अनेकांचे हाल होत आहेत. शहापूर आगारातील अशाच एका एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे.

शहापूर आगारातील ३५ वर्षीय एसटी बसचालक शिवनाथ फापाळे यांनी नाशिक येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. राज्यभर सुरू असलेला एसटी महामंडळ कर्मचारी वर्गाच्या संपामुळे कर्मचाऱ्यांसमोर उभे राहीलेले आर्थिक संकट व आलेल्या नैराश्यातून या चालकाने आत्महत्या केल्याची चर्चा शहापूर आगार परिसरात केली जात आहे.

सगळी व्यवस्था एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पहात असली तरी संपातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करुन जगावे. कोणीही नाउमेद होऊन टोकाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती संपातील सहभागी कर्मचारी पांडुरंग दुधाळे यांनी केली आहे.