चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप
ठाणे : ठाण्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बसला सकाळी आग लागण्याची घटना घडली होती. बस चालकांच्या सतर्कतेमुळे ६५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
आज सकाळी ८च्या सुमारास ठाणे स्टेशन येथून भिवंडी डेपोची बस ठाण्याहून भिवंडीकडे जात होती. सकाळी ८.१५च्या दरम्यान उथळसर येथील प्रभाग समिती कार्यालयाजवळ ही बस आली असता शॉर्टसर्किट होऊन स्टार्टरमधून धूर येऊ लागल्याचे बस चालक आनंद सवारे आणि वाहक अजित कांबळे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखून बसमधील सर्व ६५ प्रवाशांना बसच्या खाली उतरवले, त्यामुळे एकही प्रवासी जखमी झाला नाही. बसने पेट घेतल्यानंतर त्याची माहिती जवाहरबाग अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. त्यांनी बसचालक श्री.सवारे, वाहक श्री. कांबळे, स्थानिक नागरिक, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी एक पिकअप व्हॅन, दोन फायर इंजिनच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
बसचालक आणि वाहकांनी प्रसंगावधान दाखवले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला, असे बसमधील प्रवशांनी सांगितले. या घटनेची तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.