अनेक कर्मचारी वेतन खाते दुस-या बँकेत उघडणार ?
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी) कर्मचा-यांना त्यांचे वेतन खाते इतर बँकांमध्ये उघडण्याची संमती दिल्यानंतर असंख्य कर्मचा-यांनी खाजगी बँकसंबंधित व्यवहार सुरु केले असल्यामुळे बँकेच्या वित्तीय सल्लागारांनी व मुख्य लेखा अधिकारी यांनी विविध सुचना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एस.टी. बँकेला झटका तर बसलाच असून, विविध सुचनांमुळे बँकेचे कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचा-यांना राष्ट्रीयकृत व खाजगी बँकेत खाते उघडण्यासाठी मान्यता दिली. त्याचप्रमाणे एसटी कर्मचा-यांनाही भारतीय स्टेट बँक व स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेव्यतिरिक्त फेडरल बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेमध्ये खाते उघडण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. ज्या कर्मचा-याने भारतीय स्टेट बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतल्यास अशा कर्मचा-यांना इतर बँकांमध्ये वेतन खाती उघडण्यापूर्वी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक राहणार आहे.
कर्मचारी/अधिकारी यांनी इतर बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यातच वेतन प्राप्त करुन त्याचे बचत खाते वेतन खात्यात बदलण्याची कार्यवाही वैयक्तिक स्तरावर करावी लागणार आहे. एस.टी. महामंडळ अशा कर्मचा-यांच्या वैयक्तिक कर्जाची हमी महामंडळ घेणार नाही तसेच आरटीजीएस व एनईएफएटी बाबतचा आकारही संबंधित कर्मचा-याकडूनच वसुल करण्यात येईल, असा नियम बँकेच्या वित्तीय सल्लागारांनी व मुख्य लेखा अधिका-यांनी कर्मचा-यांच्या निदर्शनास आणला. अशा नियमांमुळे एसटी कर्मचारी व अधिकारी यांची कोंडी होण्याची दाट शक्यता आहे, असे बँकेच्या एका अधिका-यांने सांगितले.