ठाणे: बॅडमिंटन क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी आणि २०१९-२० या वर्षासाठी छत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले श्रीकांत वाड यांची ठाणे महानगरपालिकेच्या ‘स्वच्छ ब्रँड ॲम्बेसेडर’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकांत वाड यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे राज्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने त्यांना ‘स्वच्छ ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले आहे.
या नियुक्तीबद्दल बोलताना ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे म्हणाल्या, ” श्रीकांत वाड यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि स्वच्छतेच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे ठाणे शहर स्वच्छ, हरित आणि अधिक शाश्वत बनण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”
‘स्वच्छ ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून श्रीकांत वाड विविध स्वच्छता मोहिमा, जनजागृती सभा आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ठाणेकरांमध्ये जबाबदारी आणि अभिमानाची भावना जागृत करण्याचे काम करतील. त्यांच्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास ठाणे महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.
श्री. श्रीकांत वाड यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वच्छतेच्या कार्याप्रती असलेल्या त्यांच्या तळमळीमुळे ठाणे शहर स्वच्छता आणि शाश्वततेच्या बाबतीत आदर्श शहर बनेल, असा विश्वास ठाणे महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.
श्री. वाड यांनी सदर जबाबदारीबद्दल ठाणे महानगरपालिकेचे आभार मानून त्याला न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे.