श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा आयपीएललाही बसला मोठा फटका

सध्या श्रीलंकेसमोर मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. या आर्थिक संकटाचा फटका श्रीलंकेमधील सर्वच क्षेत्रांना बसला असून प्रासरमाध्यम समुहांमधूनही लोकांना कामावरुन काढून टाकण्यात येत आहे. अनेक टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात केल्याने लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आलीय. याच कारणामुळे इंडियन प्रिमीअर लीगलाही फटका(IPL 2022 in Sri Lanka) बसला आहे.

श्रीलंकेमधील दोन महत्वाच्या वृत्तपत्रांमधील आयपीएलचं वृत्तांकन पूर्णपणे बंद करण्यात आलंय. या वृत्तपत्रांमध्ये आता वेळ आर्थिक संकटासंदर्भातील वृत्तांकन केलं जात आहे. याचप्रमाणे अनेक स्पोर्ट्स चॅनेलने कर्मचारी कपात केल्याने आयपीएलचं लाइव्ह टेलिकास्टही बंद करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी आवश्यक कर्मचारी संख्याच नसल्याने आयपीएलच्या प्रसारणावर परिणाम झालाय.

“देशातील अनेक क्रिकेटप्रेमींना आयपीएलचं थेट प्रक्षेपण हवं आहे. स्थानिक चॅनेल्सलाही आयपीएलच्या सामन्यांचं प्रक्षेपण हवं आहे. मात्र सध्या देशात असणारं आर्थिक संकट एवढं मोठं आहे की आयपीएलचं थेट प्रक्षेपण थांबवावं लागलंय. काही आठड्यांपूर्वी सरकारने शाळांमधील परीक्षाही पेपरचा तुटवडा असल्याने रद्द करण्यात आल्यात,” असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. सामन्यांचं प्रक्षेपण रद्द झाल्याने याचा परिणाम जाहिरातींवर आणि पर्यायाने चॅनेल तसेच आयपीएलच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर होणार आहे.

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने सध्या मुंबई इंडियन्सच्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून काम करतोय. देशातील परिस्थिती पाहून वाईट वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे. लोकांच्या गरजांकडे सरकार दुर्लक्ष करु शकत नाही असं सांगतानाच लोकांच्या हक्कांच्या संरक्षणाचं काम सरकारचं असल्यांच जयवर्धने म्हणालाय.

श्रीलंकेचे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू सध्या आयपीएलशी संबंधित असून काहीजण प्रशिक्षक म्हणून काम करतायत तर काही खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.