मीरा-भाईंदरमध्ये ‘एसआरए’ आणि क्लस्टर योजना लवकरच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

भाईंदर: ठाणे आणि मुंबईप्रमाणे मीरा भाईंदरचा झपाट्याने विकास होत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीप्रमाणे शहरातील धोकादायक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर योजना’ आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना लवकरच लागू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथे बोलताना काल रात्री केली.

प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक, भाईंदर पूर्व येथे संस्कृती मीरा-भाईंदर आर्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते. काल समारोपाच्या दिवशी उपस्थित मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सरनाईक यांच्यामुळे मुंबई-ठाण्यासारखा विकास मीरा-भाईंदरमध्ये दिसत आहे. मुंबईतील प्रसिद्ध काळा घोडा फेस्टिवलसारखा उपवन फेस्टिव्हल आणि मीरा-भाईंदरचे संस्कृती आर्ट फेस्टिव्हल त्यांनी सुरू केले, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमदार सरनाईक यांचे कौतुक केले.

मीरा-भाईंदरच्या जुन्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर क्लस्टर योजना आणि झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी मीरा-भाईंदर झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूर करावी, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी भाषणात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी लगेच मान्य करत क्लस्टर व एसआरए मीरा-भाईंदरमध्ये तत्काळ लागू केले जाईल, अशी घोषणा केली.

१८०० कोटी खर्च करून दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे भूमिपूजन पुढील महिन्यात करून या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याकडे आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. दहिसर-भाईंदर लिंक रस्त्याचे आम्ही लवकरच काम सुरु करत आहोत. म्हणजे टोलनाका बायपास होईल, असे सांगत हा लिंक रस्ताही वेगाने पूर्ण करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मीरा भाईंदरवर विशेष प्रेम असून ते अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे मीरा भाईंदरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी कमी पडणार नाही, आमदार सरनाईक यांच्या पाठीशी सरकार ठाम आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मीरा-भाईंदर मेट्रो कारशेडचा निर्णय लवकरच
मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुरु असून राई, मोरवा भागातील स्थानिकांचा कारशेडला विरोध आहे. त्यामुळे भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून पुढे उत्तनपर्यंत मेट्रो नेऊन उत्तन येथील शासकीय जमिनीवर मेट्रो कारशेड करावे, अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली. त्यावर आम्ही तेथील जनतेच्या भावनांची दखल घेतो. लोकांच्या विरोधात जाऊन आम्ही काही करणार नाही. लोकांना हवे तेच सरकारकडून देणार आहोत. आमचा पर्सनल काही अजेंडा नाही , असे सांगत आमदार सरनाईक यांच्या मागणीप्रमाणे मेट्रो कारशेड उत्तनच्या सरकारी जमिनीवरच केले जाईल , असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की , मीरा भाईंदरमध्ये सरनाईक यांनी खूप निधी आणला आहे. २००९ पासून मेट्रो , पाणी , क्लस्टर,रस्ते अशा अनेक गोष्टीसाठी मी व सरनाईक यांनी विधिमंडळात आंदोलने केली. सरनाईक यांनी खूप लढाई केली मीरा भाईंदरची मेट्रो मंजूर करून आणण्यासाठी, सरनाईक यांनी जोर-शोर लावला आणि मेट्रो आणली. आता सूर्या योजनेच्या २१८ एमएलडी पाण्यासाठी ५१६ कोटी, काँक्रीट रस्त्यांसाठी एक हजार कोटी अशा विविध कामांसाठी निधी दिला आहे. ही सगळी कामे आमदार सरनाईक यांनी मीरा-भाईंदरसाठी केली आहेत, म्हणून येथील जनता त्यांच्यासोबत ठाम आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

देशातील सुप्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांचा ‘ इंडियन हिंदी पोएट’ हा कार्यक्रम काल हजारोंच्या गर्दीत उदंड प्रतिसादात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांचे आमदार सरनाईक यांनी स्वागत केले. यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, माजी आमदार मुजफ्फर हुसेन, गिलबर्ट मेंडोन्सा, युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.