निकोप सामाजिक स्वास्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्यक

सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांचे प्रतिपादन

ठाणे: क्रीडा स्पर्धांमधून समाजाचे स्वास्थ्य निकोप राहते. परिणामी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत होते. ‘ठाणेवैभव’ हे कार्य गेली ४९ वर्षे अखंडपणे करत आहे, अशा शब्दांत ठाण्याचे सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कौतुक केले.

‘ठाणेवैभव’ आयोजित ४९वी ठाणेवैभव करंडक आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेला आज प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन श्री.चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकारिता करीत असताना ठाणेवैभव सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचीही सेवा करीत आहे. गेली ४९ वर्षे अखंडपणे क्रिकेट स्पर्धा आयोजित ते करीत आहेत. अशा स्पर्धांमुळेच समाजातील वातावरण निकोप राहते. परिणामी कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यात पोलिसांना मदत होते. अशा शब्दांत श्री.चव्हाण यांनी ठाणेवैभवचे कौतुक केले. तसेच खेळाडूंनी स्पर्धेत उतरताना विजय पराजयाच्या पलीकडे जाऊन पहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी गेल्या ४९ वर्षांच्या करंडक स्पर्धेचा आढावा घेतला. ठाणे जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात ठाणेवैभवचे मोठे योगदान आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांच्या पाठीशी ठाणे वैभव नेहमीच राहिले तर उदयोन्मुख खेळाडूंना आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे श्री.बल्लाळ म्हणाले.

यावेळी ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ, जुईली बल्लाळ, अष्टपैलू क्रिकेटपटू मुकुंद सातघरे, स्पोर्टिंग क्लब कार्यकारिणीचे सदस्य सुशील म्हापूसकर, समन्वयक प्रल्हाद नाखवा आदी उपस्थित होते.