स्पोर्टिंग क्लब कमिटीचा दणदणीत विजय

ठाणे : राहुल पहाडियाची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर संतोष भोरच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर यजमान स्पोर्टिंग क्लब कमिटीने मायावंशी क्रिकेट क्लबचा ७ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ६५ व्या शामराव ठोसर क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने आगेकूच केली.

सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना राहुल, सौद मंसुरी आणि शशांक जाधवने अचूक गोलंदाजी करत मायावंशी क्रिकेट क्लबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहण्याची संधी मिळू दिली नाही. त्यांच्या रोहन चौघुले (२८) आणि आदित्य परुळेकरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्येला स्पर्श करता आला नाही. राहुलने सात षटकात दोन निर्धाव षटकांसह ५४ धावांत ४ विकेट्स मिळवल्या. तर सौद मंसुरीने आठ षटकात तीन निर्धाव षटके टाकत २३ धावांत ३ फलंदाज बाद केले. शशांक जाधवनेही ३ विकेट्स मिळवताना एक निर्धाव षटक टाकत सात षटकात १५ धावा दिल्या. मायावंशी क्रिकेट क्लबला ३२ षटकात ११० धावापर्यत मजल मारता आली.

या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या संतोष भोर आणि संकेत जाधवने पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत संघाचा मोठा विजय निश्चित केला. संतोषने सात चौकार आणि दोन षटकार ठोकत ३० चेंडूत ४७ धावा केल्या. संकेत जाधवने २८ धावांची खेळी करताना १९ चेंडूत तिन चौकार आणि दोन षटकार मारले.  १५ व्या  षटकांतील पहिल्या चेंडूवर १११ धावा करून यजमानांनी सामना जिंकला. पराभूत संघाच्या मयूर ढाणेने २८ धावांत दोन आणि आदित्य परुळेकरने एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

मायावंशी क्रिकेट क्लब : ३२ षटकात सर्वबाद ११० ( रोहन चौघुले २८, आदित्य परुळेकर १८, सौंद मंसूरी ८-३-२३-३, राहुल पहाडिया ७-२-५४-४, शशांक जाधव ७-१-१५-३) ७ विकेट्सनी पराभुत विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी : १४.१ षटकात ३ बाद १११ (संकेत जाधव २८, संतोष भोर ४७, मयूर ढाणे ६-२-२८-२)