आतकोली येथे कचरा वाहतुकीला वेग

आयुक्त सौरभ राव यांची पाहणी

ठाणे : ठाण्यातील घनकचरा समस्येवर मात करण्यासाठी सीपी तलाव येथील कचऱ्याचे मौजे आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरण सुरू झाले असून आता घंटागाड्यांमार्फत होणारे, घरोघरी कचरा संकलनाचे काम तत्काळ सुरू करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत.
बुधवार, १२ मार्चपासून, सीपी टँक येथे साचलेला कचरा २४ तास आणि तीन सत्रांमध्ये काम करून आतकोली येथील क्षेपणभूमीवर पाठवण्यात येत आहे. दिवसाला सरासरी ९० वाहने हा कचरा नेत असून आतापर्यंत सुमारे सात हजार मेट्रिक टन कचरा सीपी टँक येथून आतकोली येथील क्षेपणभूमीवर नेण्यात आला आहे. आतकोली येथे पाठवण्यात आलेल्या कचऱ्यावर दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणे, तसेच मातीचा थर देणे आधी शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

आयुक्त सौरभ राव यांनी रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा वागळे इस्टेट येथील सीपी टॅंक येथील कचरा हस्तांतरण प्रकल्पाला भेट दिली. तेथे साचलेला कचरा लवकरात लवकर आतकोली येथे पाठवण्यासाठी केलेल्या नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला. या भेटीच्या वेळी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

सीपी टँक येथील कचरा हस्तांतरण प्रक्रिया वेगाने सुरू झाली असल्याने आता शहरात साचलेला कचराही लवकरात लवकर उचलला जावा. त्याचबरोबर घंटागाड्यांद्वारे नियमितपणे केली जाणारी, घरोघरी कचरा संकलनाची व्यवस्था तत्काळ कार्यान्वित करावी, असे निर्देश या पाहणीनंतर आयुक्त राव यांनी दिले.