अनधिकृत फलक हटवण्याच्या मोहीमेला वेग

रोज दंड, रोज गुन्हे होणार दाखल

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर, नोटीसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका क्षेत्राचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी दैनंदिन मोहीम राबवून अनधिकृत फलक हटवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाचेही अतिशय काटेकोर आदेश आहेत. त्याचे पालन सगळ्यांनी करावे. अनधिकृत पोस्टर, बॅनर, फलक लावला की त्यावर नोटीस, दंड आकारणी आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे आयुक्त राव म्हणाले.

ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक घेतली. त्यास, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागांकडील कामांचा आढावा घेणारे सादरीकरण केले.

जानेवारी महिन्यात वृक्ष छाटणीचा पहिला टप्पा

दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी होत असलेल्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात. त्यामुळे वृक्ष छाटणी दोन टप्प्यात करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी दिले होते. त्यानुसार, उद्यान विभागाने नियोजन केले आहे. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिली.