अंबरनाथ : अंबरनाथमध्ये बहुमजली नागरी सुविधा सेंटरच्या कामाने आता गती घेतली आहे. पूर्वेकडील साई सेक्शन परिसरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या व्यायामशाळेच्या जागेत महिला सक्षमीकरण अंतर्गत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, यांचा खासदार निधी आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या आमदार निधीतून माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या प्रयत्नांतून सिव्हीक सेंटरची निर्मिती होणार आहे.
शहरातील नोंदणीकृत सुयोग महिला मंडळाला त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी व्यायामशाळा वापरण्यास देण्यात आली होती, पण ती वास्तू जीर्ण झाल्याने संबंधित जागेमध्ये समाजमंदिर बांधावे अशी मागणी नगरपालिकेकडे सुनील चौधरी यांनी केली होती.
बहुमजली सिव्हीक सेंटरच्या तळमजल्यावर सुयोग मंडळाला जागा देण्यात येणार आहे. तसेच इमारतीमध्ये पुस्तक केंद्र, सभागृह, आदी उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे श्री .चौधरी म्हणाले. तत्कालीन प्रशासक डॉ.प्रशांत रसाळ यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये वैशिष्टयपूर्ण अनुदानंतर्गत कानसई येथे डी डी स्कीम 15 मधील नागरी सुविधा सेंटर बांधकाम करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला कार्याचे आदेश दिले होते. या कामाची अंदाजित रक्कम दोन कोटी, 83 लाख रुपये इतकी आहे. एक वर्षात काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. नागरी सुविधा केंद्राची पाहणी नुकतीच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली