कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर
मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिला आहे. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळे जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेगही वाढणार आहे.
गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारे एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचे अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज 75 हून अधिक प्रवासी व मालगाड्यांची ये-जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द केला आहे.
कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकुर अशा 740 किमी अंतरापर्यंत पसरलेला आहे. मात्र कोकण रेल्वेवर रोहा ते वीर 46.8 किमीच्या रेल्वे मार्गाचे ऑगस्ट 2021 रोजी दुहेरीकरण पूर्ण झाले. मात्र त्यानंतर दुहेरीकरणाबाबत जलदगतीने पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होतो. उत्तर आणि दक्षिण भारताला कमी प्रवास खर्चात आणि जलदगतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते. पण वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कोकण रेल्वेमध्ये नसल्याने,अनेक वर्षांपासून कोकण रेल्वेचे दुहेरीकरण करण्याची मागणी होत आहे.
कोकण रेल्वेचे संपूर्ण दुहेरीकरण करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आता टप्पा दुहेरीकरण करण्याकडे कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.
कसे असेल दुहेरीकरण?
सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे 15 ते 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर, घाट, बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च 80 ते 100 कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून त्यासाठी 530 कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल. सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी 55 रेल्वेगाड्या आणि 18 मालगाड्या धावतात. दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल.